औरंगाबाद - तब्बल पाच महिन्यांच्या विश्रांतीनंतर लालपरी (एसटी बस) रस्त्यावर धावायला सुरुवात झाली आहे. पंरतू, पाच महिने एका जागेवर उभी असूनही या बसेस रस्त्यावरून धावताना कुठलीही अडचण आली नाही की, धावणारी बस बंद पडली नाही. याचे कारण म्हणजे पाच महिने बस सेवा बंद असली तरीही, या बसेसची देखभाल आणि दुरुस्ती वेळेवर करण्यात आली होती. ही सगळी कामे आगारातील तांत्रिक कर्मचारी अगदी प्रामाणिकपणे करत होते, त्यामुळे पाच महिन्यांनंतर देखील बसेस धावताना अडचणी आल्या नाहीत, अशी माहिती औरंगाबाद सिडको डेपोचे प्रमुख अमोल भुसारी यांनी दिली.
मार्च महिन्यापासून बस जरी आगारात उभ्या असल्या, तरीही त्यांच्या देखभाल आणि दुरुस्तीचे काम सुरू होते. तांत्रिक कर्मचाऱ्यांच्या कामाच्या वेळा बदलून अर्ध्या मनुष्यबळाचा वापर करत पाच महिने काम सुरू असल्याने राज्य सरकारने बस पुन्हा धावण्याचा निर्णय घेतल्याने त्याचवेळी सेवा सुरू करणे शक्य झाले असल्याची माहिती औरंगाबाद सिडको आगार प्रमुख अमोल भुसारे यांनी सांगितले.
हेही वाचा - संसदेचे पावसाळी अधिवेशन : कोरोनामुळे लोकसभा आणि राज्यसभेचे कामकाज एकदिवसाआड
कोरोनाच्या अनुषंगाने लॉकडाऊन करण्यात आल्याने जिल्हा बंदी झाली होती. कोरोनाचा संसर्ग वाढू नये, याकरिता परिवहन विभागाने बस सेवा बंद केली होती. पाच महिन्याच्या विश्रांती नंतर राज्य सरकारने बस सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला. पाच महिने बस आगारात उभ्या असल्याने बस मध्ये असलेल्या बॅटरी डिस्चार्ज झाल्या असतील. इंजिनमध्ये काही बिघाड झाले असतील, अशा अनेक शक्यता सर्वसामान्यांना होत्या. त्यामुळे बससेवा सुरू झाल्यावर आता बस व्यवस्थित रस्त्यावर धावतील का? असा प्रश्न होता. मात्र राज्य सरकारच्या निर्णयानंतर काही वेळातच बस पुन्हा स्थानकांवर सेवा देण्यासाठी सज्ज झाल्या.
पाच महिने बस जरी आगारांमधे उभ्या असल्या, तरीही दर पाच ते सहा दिवसांनी बसची देखभाल केली जात होती. बॅटरी बंद पडू नये म्हणून काही वेळा गाडी चालू करून ठेवली जायची. काही गाड्या नादुरुस्त होत्या त्यांच्या दुरुस्तीचे काम देखील या काळात केली गेली. तांत्रिक कर्मचाऱ्यांच्या कामांच्या वेळात बदल करून देखभाल दुरुस्तीचे काम नियमित ठेवले. त्यामुळे कुठल्याही अडथळ्याशिवाय काम सुरू करता आले.
इतकेच नाही तर, बस सेवा सुरू झाल्यानंतर बस सॅनिटाईज करूनच आगारांमधून स्थानकावर पाठवली जात आहे. प्रवाशांची आणि कर्मचाऱ्यांची काळजी घेतली जात आहे, अशी माहिती आगारप्रमुख अमोल भुसारे यांनी ईटीव्ही भारतला दिली.