औरंगाबाद - हर्सूल कारागृहाचे माजी अधीक्षक हिरालाल जाधव यांनी राष्ट्रपती आणि मुख्य न्यायधीशांकडे इच्छामरणाचा अर्ज दिला आहे. न्याय मिळत नसल्याने सुरू असलेले उपोषण कोविडचे कारण देत रद्द करण्यास भाग पाडलं त्यामुळे इच्छामरणाची परवानगी मागितल्याचे जाधव यांनी आपल्या पत्रात नमूद केलं आहे.
हेही वाचा -....अन् वडिलांच्या अस्थीतून तिने साकारला 'टॅटू'
कोविडकाळात कैद्यांकडून पेरोलसाठी पैसे घेतल्याचा झाला आरोप
मार्च 2020 नंतर कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता कारागृहात जास्त गंभीर गुन्ह्यात अटकेत नसलेल्या कैद्यांना पेरोलवर सोडण्याची मुभा देण्यात आली होती. त्यावेळी हर्सूल कारागृहातील कैद्यांना सोडण्यासाठी कारागृह अधीक्षक हिरालाल जाधव यांनी पैसे मागितल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला. त्यावेळी कैद्याने केलेल्या फोन रेकॉर्डिंगवरून जाधव यांच्यावर कारवाई करत तडकाफडकी बदली पुणे कारागृहात करण्यात आली होती. त्यानंतर त्यांना निलंबित करण्यात आले होते. मात्र ही कारवाई चुकीची असल्याचे जाधव यांनी पत्रात नमूद केलं.
कारवाईपूर्वी चौकशी न केल्याचा जाधवांचा आरोप
एखादी तक्रार प्राप्त झाल्यावर त्याची शहानिशा केली जाते. मात्र, माझ्यावर पैसे घेतल्याचा आरोप केल्यानंतर त्याची शहानिशा करण्यात आली नाही. ज्या कैद्याने मला पैसे दिल्याचा आरोप केला ते पैसे मला मिळाले का? किंवा माझ्यापर्यंत आलेत का? याचा तपास करण्यात आलेला नाही. कारागृहात असलेले सीसीटीव्ही आणि इतर दस्तावेज याची तपासणी करायला हवी होती. मात्र कुठलीही शहानिशा न करता सेवानिवृत्त होण्याच्या अडीच महिने आधी माझ्यावर कारवाई करण्यात आली. सदरील कारवाई चुकीची असल्याने पुणे मुख्य कार्यालयासमोर उपोषण सुरू करण्यात आले होते. मात्र उपोषणाच्या तिसऱ्या दिवशी संबंधित पोलिसांनी कोरोनाचे कारण देत उपोषण बंद करण्यास भाग पाडले. त्यामुळे आता न्याय मिळत नसल्याने इच्छामरण हा एकच पर्याय शिल्लक असल्याने देशाचे महामहीम राष्ट्रपती आणि सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश यांच्याकडे इच्छामरनासाठी अर्ज केला असून एक महिन्याच्या आत ती परवानगी द्यावी असं पत्रात नमूद केल्याचं हिरालाल जाधव यांनी सांगितलं.
हेही वाचा - बीड जिल्ह्यात गुरुवारी मध्यरात्रीपासून दहा दिवस लॉकडाऊन