नांदेड: परतीच्या पावसामुळे मराठवाड्यात पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. (Heavy Rain In Marathwada). विशेषत: नांदेड, हिंगोली, परभणी व औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण या भागांत याचा अधिक फटका बसला आहे. (Crops damage in Marathwada). नांदेड जिल्ह्यात ५ ऑक्टोबर पासून दररोज मध्यम ते हलक्या स्वरूपात पाऊस पडतो आहे. सोमवारी सायंकाळीही पावसाने मेघगर्जनेसह जोरदार हजेरी लावली आहे.
बियाणांसाठी केलेला खर्च निघणेही कठीण: मराठवाड्यातील काही तालुक्यांत शेतशिवारात पाणी साचले आहे. सध्या सोयाबीन काढणीला सुरुवात झाली आहे, तर काही ठिकाणी कापून ठेवलेल्या सोयाबीनला मोड फुटत आहेत. अतिवृष्टीमुळे बियाणांसाठी केलेला खर्च निघणेही कठीण हाेणार असल्याचे शेतकरी सांगत आहेत. हिमायतनगर तालुक्यातील पळसपूर, सिरंजनी, हिमायतनगर, सरसम, सवना, बोरगडी, धानोरा, घारापूर, डोल्हारी, कामारी, पोटा, मंगरूळ, वॉरंग टाकळी, सिरपल्लीसह अनेक गावांतील शेतकऱ्यांना या पावसाचा फटका बसला आहे. तसेच किनवट तालुक्यातील शिवणी, जलधारा या मंडळात दोन दिवसांपूर्वी जोरदार पाऊस झाला. माहूर, भोकर, अर्धापूर इतर तालुक्यातील पिकांचीही स्थिती सारखीच आहे. औरंगाबााद जिल्ह्यातील पैठण तालुक्यात १८०० हेक्टरवर सोयाबीनचे लागवड क्षेत्र असून त्यापैकी काढणीला आलेल्या १ हजार हेक्टरवर नुकसान झाले असल्याचे तालुका कृषी अधिकारी संदीप शिरसाट यांनी सांगितले.
पावसाने पिकाला धोका: या संदर्भात परभणीच्या विस्तार शिक्षण संचालनायचे अधिष्ठाता डॉ. गजानन गडदे म्हणतात की, राज्यात सर्वदूर सोयाबीन काढण्याच्या वेळी पाऊस होतो आहे. असाच पाऊस जर चालू राहिला तर सोयाबीन काढण्याला उशीर होऊ शकतो. त्यामुळे सोयाबीनच्या शेंगा जागीच फुटण्याची शक्यता आहे. ज्यांनी यावर्षी लवकर पेरणी केली होती त्यांच्या कापसाच्या बोंडांना अशा सततच्या पावसाने धोका निर्माण होऊ शकतो.