औरंगाबाद - अडीच महिन्यांनी मराठवाड्यामधून सचखंड एक्स्प्रेस धावली. नांदेडहून सकाळी ही रेल्वे निघाली. पहिल्या दिवशी जवळपास 813 प्रवाशांनी या रेल्वेने प्रवास केला आहे. या रेल्वेतून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना महाराष्ट्रात कुठेही उतरण्यास मनाई करण्यात आली असून महाराष्ट्राच्या बाहेरील थांब्यावर उतरण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत.
नांदेडहून सकाळी साडेनऊ वाजता निघालेली सचखंड एक्स्प्रेस औरंगाबाद मार्गे मध्य प्रदेश, राजस्थान, उत्तर प्रदेश, हरियाणा, दिल्ली आणि पंजाब अशी धावणार आहे. या गाडीत प्रवास करण्यासाठी जवळपास 1100 प्रवाशांची आरक्षण नक्की केले होते. मात्र, काही प्रवासी आले नसल्याने उपस्थित प्रवाशांना घेऊन अडीच महिन्यांनी गाडी धावली. चार जूनला गाडी पुन्हा मराठवाड्यात दाखल होईल.
कोरोनामुळे सुरू केलेल्या लॉकडाऊनमुळे मार्च महिन्यापासून सर्व प्रवासी वाहतूक बंद करण्यात आल्या होत्या. मे महिन्यात श्रमिक रेल्वेने राज्यात अडकलेल्या मजुरांना आपल्या राज्यात जाण्याची परवानगी देऊन सोडण्यात आले होते. त्यानंतर पहिलीच नियमित रेल्वे सुरुवात करण्यात आली आहे. नांदेडहून सकाळी साडेनऊ वाजता ही रेल्वे धावली.
नांदेडहून 426, परभणी 62, सेलू 5, पूर्णा 6, जालना 61 आणि औरंगाबाद 252 असे जवळपास 813 प्रवासी रेल्वेत प्रवास करत आहेत. या प्रवाशांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली असून या सर्वांना महाराष्ट्राच्या बाहेरील आपल्या निर्धारीत थांब्यावर उतरण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. 4 जूनला ही सचखंड एक्स्प्रेस राज्याबाहेरील महाराष्ट्रातील प्रवाशांना घेऊन राज्यात दाखल होणार आहे. त्यावेळी रेल्वेने आलेल्या प्रवाशांची वैद्यकीय तपासणी करून त्यांना क्वारंटाईन व्हावे लागणार आहे.
औरंगाबादहून निघालेल्या या रेल्वेचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी अमित फुटाणे यांनी...