औरंगाबाद - बंडखोर आमदार संजय शिरसाठ ( Rebel MLA Sanjay Shirsath ) यांनी शिवसेनेतील बंडखोरीवर बोलतानाच आजही आपण उद्धव ठाकरेंसोबत ( Uddhav Thackeray ) असल्याचं सांगितलं. शिवसेनेचे आणि आमचे नाते खूप वेगळे आहे. आम्ही मातोश्रीला कधीही सोडणार नाही, असे संजय शिरसाठ म्हणाले. त्याचवेळी त्यांनी शिवसेनेतील बंडखोरीचे खापर संजय राऊत यांच्यावर फोडले. संजय राऊत ( Sanjay Raut ) यांची भाषा कधीही योग्य नव्हती. त्यांच्यामुळे शिवसेनेतल्या उठावनंतर बंडखोर आमदार आमि शिवसेनेतील दरी आणखी वाढतच गेली, असे शिरसाठ म्हणाले.
संजय राऊत यांच्यामुळे दरी वाढली - शिवसेनेतील आमदारांनी उठाव केला. त्यात प्रवक्ते म्हणून संजय राऊत यांनी मध्यस्ती करत वाद मिटवणे अपेक्षित होत. मात्र, त्यांनी तसे केले नाही. सतत केलेल्या वक्तव्यांनी दरी वाढली. त्यांनी वापरलेली भाषा पटणारी नव्हती. महिलांविषयी केलेले वक्तव्य मनाला लागले. स्व बाळासाहेब ठाकरे कोणालाही बोलत होते. त्यांचे बोलणे कोणाच्या मनाला लागणारे नव्हते. तुम्ही साहेब नाही आहात, अशी आगपाखड आ. संजय शिरसाठ यांनी संजय राऊतांवर केली. रोज सकाळी येऊन ते वेगवेगळे वक्तव्य करतात. बहुदा त्यांना त्याच व्यसन लागले आहे. सकाळी पत्रकार आले नाही तर त्यांना काही तरी चुकल्यासारखे वाटत असेल. आता लोक त्यांना बोअर झाले आहेत. त्यांना पाहून लोक आता टीव्ही बंद करू लागले आहेत, अशी टीका आ संजय शिरसाठ यांनी केली.
जनता ठरवेल - आ. संजय शिरसाठ यांनी बंड करताच त्यांच्यावर शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांच्यासह स्थानिक पदाधिकाऱ्यांनी ते मुंबईत पडिक असल्याची टीका केली. त्यावर आ. शिरसाठ यांनी संयमाने उत्तर दिले. मी चुकलो असेल तर लोक मला निवडणुकीत उत्तर देतील. आज मुंबईत जाऊन बसलो अशी टीका करतात. मी जर तसं केले असते तर लोकांची कामे झाली असती का? आज मी जेव्हा परत आलो त्यावेळी माझा सत्कार लोकांनी केली असता का? दोन दिवस झाले माझ्याकडे लोक येऊन निर्णय योग्य असल्याचं सांगत आहेत. हे कसे झाले असा प्रश्न आ. शिरसाठ यांनी उपस्थित करत टीका करणाऱ्या सेना नेत्यांना उत्तर दिले.
याआधी बोलू दिले नाही - शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे किंवा आदित्य ठाकरे यांच्यावर कोणी हल्ला करण्याचा प्रयत्न केला तर आम्ही तो झेलू, शिवसेनेने आम्हाला जे दिले त्याचे ऋण कधीही विसारण्यासारखे नाही. याआधीही काही लोक बोलत होते, त्यावेळी आम्ही बोलण्याचा प्रयत्न केला तर आमच्याच काही लोकांनी उत्तर देण्यास मनाई केली. महाराष्ट्र बंद करण्याची ताकद शिवसेनेत आहे. उद्धव साहेबांनी एक आवाज दिला तर आम्ही रस्त्यावर उतरायला कमी करणार नाही. आम्ही त्यांच्यासोबत असू, मातोश्री आमचीच आहे आणि राहणार असा विश्वास आ. संजय शिरसाठ यांनी व्यक्त केला.