औरंगाबाद - धनगर समाजाला अनुसूचित जातीचे घटनेने दिलेले आरक्षण द्या, या मागणीसाठी धनगर समाज बांधवांनी मानवी साखळी करत जिल्ह्यात आंदोलन केले. औरंगाबाद ते जालना दरम्यान गावोगावी मानवी साखळी तयार करत हे अनोखे आंदोलन करण्यात आले. राज्याचे मंत्री संदीपान भुमरे यांच्या घरापासून ते केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या घरापर्यंत ही मानवी साखळी तयार करण्यात आली.
औरंगाबादेत मानवी साखळी आंदोलन करत असताना राज्यातील विविध भागांमध्ये अर्धजल समाधी आंदोलन करण्यात आले. औरंगाबाद ते जालनादरम्यान करमाडजवळ अर्धजल आंदोलन जय मल्हार सेनेचे लहू शेवाळे यांनी केले. धनगर समाजाला न्याय मिळाला नाही, तर हिंसक आंदोलन होऊ शकते याचा विचार केंद्र आणि राज्य सरकारने करावा, असा इशारा आंदोलकांनी दिला.
दोन्ही सरकारे आरक्षणाबाबत उदासीन
भारतीय घटनेतील अनुसूचित जमातीच्या यादीत 36 व्या क्रमांकावर असलेली धनगड हे नाव इंग्रजीत आहे. असे असले तरी महाराष्ट्रातील धनगर समाज असल्याचे केंद्र आणि राज्य सरकारने अनेकदा सिद्ध केले आहे. तसेच सर्वच राज्यकर्त्यांनी ते मान्य केले आहे. परंतु सरकारच्या उदासीनतेमुळे गेल्या ६५ वर्षांपासून धनगर समाज अधिकारापासून वंचित आहे. अधिकार मिळण्यासाठी राज्यातील धनगर समाज लोकशाही मार्गाने अनेक वर्षांपासून आंदोलन करत आहे.परंतु महाराष्ट्र सरकार धनगर समाच्या मागणीकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप जय मल्हार सेनेचे शेवाळे यांनी केला. भारतीय जनता पक्षाचे असो की महाविकास आघाडीचे दोन्ही सरकार धनगर आरक्षणाबाबत उदासीन असल्याचा आरोप शेवाळे यांनी केला.
मुख्यमंत्र्यांनी आरक्षणाच्या सवलती लागू कराव्यात-
टाटाच्या समितीची स्थापना करून पाच वर्ष धनगर समाजाची दिशाभूल करण्यात आली. तत्कालीन, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धनगर समाजाला अनुसूचित जमातीचे आरक्षण देणार अशा फक्त घोषणा केल्या आहेत. त्यांनी धनगर समाजाचा घात केला. मागील सरकारच्या काळात विधानसभा निवडणुकीच्या वेळेस शिवसेना पक्षप्रमुख तसेच आताचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांनी एक दिवसाचे अधिवेशन घेऊन धनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या आरक्षण देऊ, असे मागणी केली होती. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांनी राज्यात धनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या सवलती लागू कराव्यात. याबाबत ठराव तातडीने मंत्रिमंडळाची बैठक घेऊन संमत करावा. याबाबत तसा अभिप्राय करीत केंद्राकडे पाठवावा, अशी लहू शेवाळे यांनी मागणी केली.
संदिपान भुमरे यांच्याकडून धनगर समाजाचा अपमान झाल्याचा आरोप-
महाराष्ट्र सरकारचा अभिप्राय प्राप्त होताच केंद्र सरकारने विनाविलंब धनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या सवलती लागू कराव्यात. त्याची अंमलबजावणी तातडीने करावी. या मागणीसाठी आज औरंगाबाद ते जालना अशी मानवी साखळी तयार करत आंदोलन करण्यात आले. यावेळी राज्याचे मंत्री संदिपान भुमरे यांच्या घराजवळ या आंदोलनाला सुरुवात करण्यात आली. आंदोलन असताना संदिपान भुमरे यांनी धनगर समाजाचा मान ठेवत निवेदन स्वीकारण्यासाठी आपल्या निवासस्थानी असणे गरजेचे होते. मात्र, निवेदन स्वीकारण्यासाठी ते उपस्थित राहिले नाहीत. त्यामुळे हा धनगर समाजाचा अपमान आहे. केंद्र आणि राज्य सरकारच्या सर्वच नेत्यांचा निषेध करत असल्याचे लहू शेवाळे यांनी सांगितले.