औरंगाबाद - शहरात झालेल्या झुंडबळी (मॉब लिंचिंग)च्या दोन्ही घटना बनावट असल्याचा संशय बळावला आहे. रस्त्यावरील किरकोळ भांडणाचा जय श्रीरामशी संबंध जोडून शहर अशांत करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. पोलीस तपासात काही बाबी समोर आल्या असून पोलीस याबाबत कठोर पावले उचलणार असल्याचे पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांनी सांगितले.
शेख अमेर शेख अकबर हा झोमॅटोमध्ये डिलिव्हरी बॉय म्हणून काम करतो. तो ग्राहकाला ऑर्डर देण्यासाठी शेख नासेर शेख निजामोद्दीनला सोबत घेऊन आझाद चौकाकडून बजरंग चौकाकडे जात होता. तेव्हा नारायणी रुग्णालयाच्या गेटसमोरील रस्त्यावर त्यांच्या दुचाकीच्या एक कार आडवी आली. या कारमधील लोकांनी त्यांच्याशी वाद घालून आणि धमकावून त्यांना जय श्री राम म्हणायला लावल्याची तक्रार देण्यात आली होती.
देण्यात आलेल्या तक्रारीवरून कारमध्ये असणाऱ्या संदीप साईनाथ औताडे, सुनील परमेश्वर घाटूळ, अक्षय नवनाथ लावंड आणि ऋषीकेश अंकुशराव पोले यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. चौकशीत संदीप कार चालवत होता. त्याच वेळी एका कंपनीची खासगी बसही तेथे आली. तेव्हा कारचालक संदीप आणि खासगी बसचालकात किरकोळ बाचाबाची झाली. त्यावेळी आमेर आणि नासेर यांच्यासोबतदेखील बाचाबाची झाली होती. त्यानंतर अचानक काही युवकांनी गोंधळ निर्माण केला.
सीसीटीव्हीवरून आला संशय -
या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांच्या हाती लागले आहे. त्यामुळे या घटनेबाबत शंका उपस्थित झाली. कारण सीसीटीव्हीमध्ये अवघे 50 सेकंद आमेर आणि कार चालवत असलेला संदीप समोरासमोर आले आहेत. त्यामुळे इतक्या कमी वेळात हा वाद झाला कसा? असा प्रश्न निर्माण झाला आहे. याबाबत पोलिसांनी चौकशी सुरू केली असून कोणी चुकीच्या पद्धतीने शहराचे वातावरण बिघडवत असेल तर त्याच्यावर कडक कारवाई केली जाईल, असे पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांनी सांगितले.