औरंगाबाद - कोविड काळात अनेक वेगळे अनुभव आणि समाजात अनेक बदल पाहायला मिळाले आहेत. त्यात धक्कादायक अनुभव येत आहेत ते म्हणजे वृद्धाश्रमांमध्ये होणारी वृध्दांची वाढ. गेल्या दीड वर्षांमध्ये शहरातील मातोश्री वृद्धाश्रमात मोठ्या प्रमाणात विचारणा वाढली आहे. इतकेच नाही, तर पहिल्यापेक्षा 30 टक्के अधिक वृद्धांचे आश्रमात वाढ झाल्याची माहिती मातोश्री वृद्धाश्रमाचे व्यवस्थापक सागर पागोरे यांनी दिली.
'कोविड काळात कुटुंबात वाढले वाद'
मागील दीड वर्षात कोविडचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता शासनाने कडक निर्बंध लावले होते. त्यात काही महिने नागरिकांना लॉकडाउनमुळे घरातच राहावे लागले. चोवीस तास घरात असल्याने कौटुंबिक वाद काही प्रमाणात वाढले. त्यामध्ये वृद्धांची चिडचिड वाढली. सतत होणाऱ्या वादांमुळे वृद्धाश्रमात वृद्धांना दाखल करण्यासाठी विचारणा झाली. त्यामध्ये मागील सहा महिन्यांमध्ये मोठ्या प्रमाणात नागरिकांनी संपर्क केल्याची माहिती पुढे आली आहे.
'वृद्धाश्रमाचे प्रवेश बंद केले होते'
कौटुंबिक वादांमुळे काही वेळा कुटुंबतील मुलाने, तर कधी वृद्धांनी आश्रमात भरती होण्याबाबत विचारणा केली. कौटुंबिक वाद कायमचे नसतात, कालांतराने ते संपतात. त्यामुळे समोपदेशन करण्याचा मार्ग मातोश्री वृद्धाश्रमाचे अवलंबला आहे. कधी वृद्धांची तर कधी घरातील इतर मंडळींची समजूत काढण्यात आली. वृद्धाश्रमाचा पर्याय असल्याने काहीवेळा कुटुंबातील वृद्ध किंवा मुले समजून घेत नसल्याने, लसीकरणाचे कारण देत वृद्धाश्रमाचे प्रवेश बंद ठेवले होते. त्यामुळे अनेकांनी वृद्धाश्रमाचा प्रवेश रद्द केला. ही चांगली बाब असल्याचेही पागोरे म्हणाले आहेत.
'मागील काही महिन्यांमध्ये अनेकांनी घेतला प्रवेश'
वृद्धाश्रमाचे समोपदेशन करूनही अनेक वृद्धांनी आश्रमात भरती होण्यासाठी पाठपुरावा केला. नाईलाजास्तव काही वृद्धांना प्रवेश देण्यात आला. त्यातही हे प्रमाण अधिक आहे. कोरोनाचे निर्बंध लागण्यापूर्वी महिन्याला 3 ते 4 प्रवेश होत होते. मात्र, ते प्रमाण आता 30% वाढले आहे. ही चिंतेची बाब असल्याचे मत सागर पागोरे यांनी व्यक्त केले आहे.