औरंगाबाद - औरंगाबाद येथे स्मारकाऐवजी महिला व शिशुसाठी उभारण्यात येणाऱ्या सुसज्ज ४०० खाटांच्या रुग्णालयास गोपीनाथ मुंडे ( Gopinath Munde Name to hospital ) यांचे नाव देण्यात यावे. तसेच महाराष्ट्रात महापुरुषांचे स्मारक शासकीय निधीतुन ( memorials of great men ) उभारण्या ऐवजी त्यांच्या नावाने सर्वसामान्य जनतेसाठी अद्यावत रुग्णालय, शाळा, महाविद्यालय व हॉस्टेल उभारण्याचे निर्देश संबंधितांना द्या. शिवसेना पक्षातील सर्व नेतेमंडळी, पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी महापुरुषांचे स्मारक व पुतळ्यांचे बांधकाम लोकवर्गणीतून करण्याचे सुचना देण्याची मागणी खासदार इम्तियाज जलील ( MP Imtiaz Jalil ) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ( Chief Minister Uddhav Thackeray ) यांच्याकडे केली आहे.
'पुतळ्यांना विरोध राहणार' : महाराष्ट्रात नव्याने उभारण्यात येणाऱ्या स्मारक व पुतळ्यास माझा विरोध आहे व राहणारच. मी माझ्या मतावर ठाम असून स्मारक व पुतळ्याऐवजी त्या महापुरुष व लोकनेत्यांच्या नावाने सर्वसामान्य जनतेला लाभ मिळेल, असे लोकोपयोगी प्रकल्पास माझा संपुर्ण पाठिंबा असणार असल्याचे मुख्यमंत्री यांना दिलेल्या पत्रात इम्तियाज जलील यांनी सांगितले आहे. महाराष्ट्र राज्यात आजवर अनेक महापुरुष व लोकनेत्यांनी जन्म घेतलेला आहे. महापुरुष व लोकनेते यांनी आपल्या कामातून एक नविन ओळख निर्माण करुन आपले संपूर्ण आयुष्य फक्त सर्वसामान्य जनतेच्या भवितव्यासाठी, महाराष्ट्राच्या सर्वांगिण विकासासाठी पणाला लावले होते. अशा महान महापुरुष व लोकनेते यांचे फक्त स्मारक व पुतळे उभारण्याऐवजी त्यांच्याच नावाने अद्यावत रुग्णालय, शाळा, महाविद्यालय व हॉस्टेल उभारावे हिच या सर्वांना खरी श्रध्दांजली असणार आहे, असेही ते म्हणाले.
'आरोग्य व्यवस्था सज्ज हवी' : संपूर्ण भारतात कोरोना या संसर्गजन्य जिवघेणी विषाणूने थैमान घातले होते. त्यामुळे सर्वसामान्य जनतेच्या जिवाला धोका निर्माण झाला. कोविड-१९ विषाणू बाधित रुग्णांना उपचारासाठी शहरात शासकीय अथवा खासगी रुग्णालयामध्ये बेडच उपलब्ध होत नसल्याने अनेकांनी आपले प्राण गमावले, हे सर्वश्रुत आहे. सद्यस्थितीत जनतेला मुलभुत सुविधांची गरज आहे. युवकांना रोजगार, उच्च शिक्षण विशेष म्हणजे सर्वप्रकारच्या जिवघेण्या आजारावर मात करण्यासाठी तातडीची वैद्यकीय सेवा हवी असल्याचे खासदार इम्तियाज जलील यांनी म्हटले.
'गोपीनाथ मुंडे यांच्याशी वेगळे नाते' : मी एएमआयएम पक्षाचा खासदार असून आमचे राजकीय व वैचारिक मतभेद आहेतच ते विसरुन विकासाच्या कामास प्राधान्य देणारे भारतीय जनता पक्षाचे लोकनेते गोपीनाथ मुंडे यांचा मला आदर आहे. गोपीनाथ मुंडे यांची ग्रामीण भागाशी नाळ घट्ट जोडली गेली असल्याने तळागळातील माणसांशी त्यांचे एक अनोखे नाते निर्माण झाले होते. गोपीनाथ मुंडे साहेबांना खरी श्रध्दांजली म्हणजे रुग्णालय हेच असणार, म्हणून मी शासनाने घोषित केलेल्या जागेवर भव्य स्मारक उभारण्याएवेजी सुसज्ज रुग्णालय उभारावे त्याकरिता मी आमदार असतांना विधानसभेत मुद्दा उपस्थित केला होता. तसेच शासनाच्या विविध स्तरावर यशस्वी पाठपुरावा करुन सर्व सोयीसुविधासह रुग्णालय बांधण्यासाठी मी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती, असेही यावेळी जलील म्हणाले.
हेही वाचा - Minister Vijay Vadettiwar : सरसंघचालकांच्या भूमिकेचे स्वागत, परंतु त्यांनी ठाम राहावे - विजय वडेट्टीवार