औरंगाबाद - राज ठाकरे यांनी सभेच्या आधी आमच्या सोबत येऊन इफ्तारला यावे, आपण सर्व जण मिळून बसूयात, असे आमंत्रण खासदार इम्तियाज जलील यांनी राज ठाकरेंना दिले आहे. सभेच्या अनुषंगाने जलील यांनी पोलीस आयुक्तांची भेट घेतली. सध्या हिंदू - मुस्लिम असा मुद्दा नाही, मुद्दा आहे कोण सर्वात जास्त हिंदुत्ववादी आहे याची. शिवसेना - भाजपा - मनसे या तीन पक्षांमध्ये हिंदुत्व कोणाकडे जास्त आहे हे दाखवण्याचा प्रकार सुरु आहे. कोण हिंदूंचे रक्षण करणार आहे, कोण जास्त हिंदुत्व पाळते यासाठी स्पर्धा सुरु आहे. आणि त्यात मुस्लिम लोकांना टार्गेट केले जात आहे. मात्र लोक आता फसणार नाहीत, असे मत खासदार इम्तियाज जलील ( MP Imtiyaz Jaleel Aurangabad ) यांनी व्यक्त केले आहे.
'नागरिक झाले भयभीत' : मनसेची सभा होत असल्याने त्या सभेनंतर शहरातील वातावरण खराब होईल, अशी भीती सर्व सामान्यांना आहे. आमच्याकडे व्यावसायिक भीती बोलून दाखवत आहेत. दोन वर्ष कोणतेही सण कोरोणामुळे साजरे करता आले नाहीत. आता व्यासायिकांनी दुकानात माल भरला आहे. वातावरण खराब झाल तर आमचे काय होईल, असे व्यावसायिकांना वाटत आहे. मात्र आम्ही त्यांना विश्वास देत आहोत की काही होणार नाही, असे जलील यांनी सांगितले. भोंग्याबाबत गृहमंत्री वळसे पाटील यांनी स्पष्टीकरण दिले आहे. भोंग्यांबाबत काही नियमावली न्यायालयाने दिली असेल तर त्याचे पालन करू, नियमांचे पालन करावे लागेल. मात्र त्यासाठी जबरदस्ती नको, ते कायम त्याची सल राहते, असे मत खासदार जलील यांनी व्यक्त केले.
हेही वाचा - Raj Thackeray Aurangabad Sabha : राज ठाकरेंच्या सभेविरोधातील याचिका फेटाळली; याचिकाकर्त्याला एक लाखांचा दंड