औरंगाबाद - महानगर पालिकेला माहिती अधिकार अंतर्गत विचारलेली माहिती देण्यास टाळाटाळ करते. त्यामुळे पालिका आयुक्तांवर कारवाई करण्याची मागमई मुख्यमत्र्यांकडे कल्याचे औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील यांनी सांगितले. महानगर पालिकेच्या कंत्राटी कर्मचारी आणि इतर कर्मचारी किती, त्यांना पगार किती याबाबत माहिती विचारली होती. त्यावर महानगर पालिकेकडून माहिती उपलब्ध झाल्यावर कळवण्यात येईल असे सांगण्यात आल्याचे खासदार इम्तियाज जलील यांनी सांगितले. इतकी महत्वाची माहिती पालिकेकडे नसणे शक्य नाही. ते मुद्दाम आम्हाला माहिती देण्यास टाळाटाळ करत असल्याचा आरोप इम्तियाज जलील यांनी पत्रकार परिषदेत केला.
महानगर पालिकेचे पुष्कळ कर्मचारी तक्रार घेऊन येतात. ज्या संस्थेला कर्मचारी देण्याचे काम दिले ती संस्था या कर्मचाऱ्यांचा पीएफ काढत नसल्याच्या तक्रारी आहेत. संबंधित ठेकेदार मोठे वेतन पालिकेकडून घेतो. मात्र, कर्मचाऱ्यांना कमी वेतन देतो अश्या तक्रारी मिळाल्याने आपण माहिती मागवली आहे. पालिकेकडे माहिती उपलब्ध नसल्याचे सांगण्यात आले आहे. यावर आयुक्तांना जाब विचारला असता याबाबत चौकशी करतो असे अजब उत्तर त्यांनी दिल्याने आपण आयुक्त निपुण विनायक यांच्यावर कारवाई करा अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे केल्याचे खासदार जलील यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
महानगर पालिकेत एमआयएम पक्षाच्या नगरसेवकांना पालिकेतील कुठल्याच कामकाजाबाबत माहिती देण्यात येत नसल्याचा आरोप जलील यांनी केला आहे. औरंगाबाद शहरात कचऱ्याचे साम्राज्य आहे. आयुक्तांच्या विनंती वरून सिडको भागात आम्ही त्यांना जागा उपलब्ध करून दिली. मात्र, त्याठिकाणी कचरा टाकण्यात आला. घान वासामुळे नागरिक त्रस्त आहेत. कुत्र्याचे साम्राज्य झाले आहे. सेंट्रल नाका आणि सिडको ऐन 12 भागात प्रक्रिया केंद्र उभारले. मात्र, त्याठिकाणी कचरा साठवला जातोय. दोन दिवसात या ठिकाणच्या कचऱ्याची समस्या सोडवली नाही, तर आम्ही तिथे लावलेल्या यंत्रणेची दोन दिवसांनी तोडफोड करू असा इशारा इम्तियाज जलील यांनी दिला. पालिकेत सर्वच कामांमध्ये भ्रष्टाचार केला जातोय. लवकरच आम्ही पालिकेतील सर्वात मोठा घोटाळा समोर आणणार असल्याचा दावा इम्तियाज जलील यांनी केला आहे.