औरंगाबाद - खासदार इम्तियाज जलील गांधीगिरी पद्धतीने आंदोलन करणार असल्याचे त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे औरंगाबाद दौऱ्यावर आहेत. त्यावेळी आंदोलन करण्यास बंदी असल्याने विमानतळापासून त्यांचे तुतारी वाजून स्वागत करणार असून, त्यांनी मराठवाड्यात केलेल्या कामांबद्दल आभार मानू, असे उपरोधिक आंदोलन करणार असल्याचे खासदार इम्तियाज जलील यांनी सांगितले.
- मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाला मुख्यमंत्री येणार -
17 सप्टेंबरला मराठवाडा किंवा हैदराबाद मुक्तीसंग्राम दिन म्हणून साजरा केला जातो. त्या दिवशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ध्वजारोहण कार्यक्रमासाठी येणार आहेत. औरंगाबाद शहरात गेल्या तीस वर्षांपासून सेनेची सत्ता आहे. या शहरात आजही समस्या कायम आहेत. इतक्या वर्ष सत्ता भोगूनही शहरात काय काम केले? असा जाब विचारण्यात येणार आहे. मात्र, त्यासाठी उपरोधिक आंदोलन करण्यात येणार असल्याचे खासदार इम्तियाज जलील यांनी संगीतले.
हेही वाचा - डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरण : आठ वर्षानंतर पाच जणांविरोधात दोषारोप निश्चित
- आंदोलन नव्हे हा सत्कार -
लोकशाहीत आंदोलन करायचे नाही, प्रश्न मांडायचे नाहीत ही हिटलरशाही झाली. पण आम्ही पोलिसांना आश्वास्त करू इच्छितो की, आम्ही कुठल्याही प्रकारचे आंदोलन, घोषणाबाजी, निदर्शने करणार नाहीत, तर आम्ही फक्त हातात पोस्टर घेऊन मुख्यमंत्र्यांचे आभार व्यक्त करणार आहोत. ठिकठिकाणी त्यांच्यावर फुलांचा वर्षाव करणार आहोत. मुख्यमंत्र्यांचे स्वागत करण्यापासून तर आम्हाला कोणी रोखू शकत नाही. त्यामुळे १७ सप्टेंबर रोजी एमआयएमचे सर्व कार्यकर्ते, मराठवाड्यावर प्रेम करणारे नागरिक आणि स्वतःला मावळे समजणारे देखील या स्वागतात सहभागी होतील, असे खासदार जलील यांनी सांगितले.
शिवसेनेने शहराचा विकास केल्याचा दावा करत एक पुस्तिका काढली, त्याला शिवसेनेच्या १४ माजी महापौरांनी हजेरी लावली. मग या महापौरांनी आणि गेली पंचवीस-तीस वर्ष शहरावर राज्य करणाऱ्या शिवसेनेने जे काही दिले आहे, त्याबद्दल आम्ही मुख्यमंत्र्यांचे आभार मानणार आहोत, असा टोला खासदार इम्तियाज जलील यांनी लगावला आहे.
- या प्रश्नांसाठी हे आंदोलन -
मराठवाड्यातील सिंचन, शैक्षणिक क्षेत्रातील अनुशेष, रेल्वेचे प्रश्न मार्गी लावणे, शहर आणि मराठवाड्याचा औद्योगिक विकास, शहरातील कचऱ्याचा प्रश्न, लोकांना चोवीस तास शुद्ध पाणी पुरवठा असे सर्व प्रश्न मार्गी (न) लावल्याबद्दल मुख्यमंत्र्यांचे आभार. मराठवाड्यातील खेळाडूंसाठी मंजूर झालेले क्रीडा विद्यापीठ, आयआयएम, एम्ससारख्या मोठ्या संस्था (न) राखल्याबद्दल आम्ही मुख्यमंत्र्यांचे आभार व्यक्त करणार आहोत. अशी टीका खासदार जलील यांनी केली.
हेही वाचा - बॉलिवूड अभिनेता सोनू सूदच्या मुंबई येथील कार्यालयाचे आयकर विभागाकडून सर्वेक्षण