औरंगाबाद - नियम तोडणाऱ्या रिक्षा चालकाला शिवसेना आमदार अंबादास दानवे यांनी श्रीमुखात लगावली आहे. वाहतूक खोळंबा झाल्याने वाहतूक सुरळीत करण्यासाठी आमदार दानवे रस्त्यावर उतरले. त्यावेळी रिक्षा चालकाचा बेशिस्तपणा पाहून त्यांनी रिक्षाचालकाच्या श्रीमुखात लगावली.
वाहतूक सुरळीत करण्यासाठी आमदार रस्त्यावर..
मंगळवार पासून औरंगाबादेत नवीन नियमावली लागू होणार आहे. नव्या निर्बंधांमुळे नागरिक गरजेचे साहित्य घेण्यासाठी बाहेर पडले. त्यामुळे मुख्य रस्त्यांवर अचानक गर्दी पाहायला मिळाली. क्रांतिचौक भागात वाहतूक खोळंबा निर्माण झाला होता. त्यावेळी तिथून जाणाऱ्या शिवसेना आमदार डॉ. अंबादास दानवे यांनी रस्त्यावर उतरून वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न केला. दानवे यांच्यासह शिवसैनिक रस्त्यावर उतरले होते. त्यातच रिक्षाचालकाने बेशिस्त पणे रिक्षा चालवत वाहतुकीस अडथळा निर्माण केला. त्यावेळी समोर उभ्या असलेल्या आमदार दानवे यांचा पारा चांगलाच चढला होता.
आमदार अंबादास दानवे यांनी रिक्षाचालकाच्या कानशिलात लगावली..
वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी पोलिसांना मदत करण्याची गरज असते. मात्र अनेक जण बेशिस्त वागतात. तसाच प्रकार झाल्याने आमदार दानवे यांनी भर चौकात रिक्षाचालकाच्या श्रीमुखात लगावली. तितक्यात कर्तव्यावर असणाऱ्या वाहतूक पोलिसाने आमदार दानवे यांची समजूत काढत रिक्षा चालकाला पिटाळून लावले. वाहतूक पोलिसांना मदत करण्याची गरज असताना अचानक हा प्रकार घडल्याचे आमदार. डॉ अंबादास दानवे यांनी सांगितले.