औरंगाबाद - औरंगाबादचे नाव संभाजीनगर व्हावे, अशी मुख्यमंत्र्यांची तीव्र इच्छा आहे. त्यामुळे सरकारी पातळीवर लवकरच औरंगाबादचे नाव संभाजीनगर होणार असल्याची माहिती पालकमंत्री तथा उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी दिली. ते माध्यमांशी बोलत होते.
स्मार्ट सिटी योजना अंतर्गत केलेल्या विकासकामांचे उद्घाटनासाठी उद्योगमंत्री सुभाष देसाई हे शहरात आले असताना त्यांनी शहराचे नाव संभाजीनगर हे नामकरण करण्यावर भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले की, पंचवीस वर्षापूर्वी शिवसेनाप्रमुखांनी औरंगाबाद शहराचे नाव संभाजीनगर करून टाकले आहे. त्यामुळे आम्ही संभाजीनगर म्हणूनच या शहराचा उल्लेख करतो .मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील खणखणीत प्रश्न विचारला, कोण लागतो औरंगजेब आपला? आपण संभाजींचा अभिमान बाळगला पाहिजे, असे स्वतः मुख्यमंत्री म्हणाले.
हेही वाचा-'औरंगाबाद नामांतर प्रकरणी भाजपाने शिवसेनेला प्रश्न विचारूच नये'
सरकारी पातळीवर लवकरच निर्णय...
पुढे पालकमंत्री सुभाष देसाई म्हणाले की, औरंगाबाद शहराचे नाव संभाजीनगर करण्याची प्रक्रिया व्हायची आहे. ही प्रक्रिया लवकरच पूर्ण होईल. त्यासाठी महाविकास आघाडीचे सरकार या प्रस्तावाला मंजुरी देणार आहे. त्यामुळे लवकरच सरकारी पातळीवर औरंगाबाद शहराचे नाव संभाजीनगर असे होणार आहे.
हेही वाचा-'औरंगाबाद नाही संभाजीनगरच..! शिवसेना अजेंड्यावर ठाम'
काय म्हणाले होते उद्धव ठाकरे?
औरंगाबादचे नाव संभाजीनगर करण्याचा वाद वाढत असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी औरंगजेब सेक्युलर नव्हता. त्यामुळे अजेंड्यातील 'सेक्युलर'मध्ये औरंगजेब बसत नाही, अशी प्रतिक्रिया दिली आहे. यावरून शिवसेना आणि काँग्रेसमध्ये नामांतरावरून होणारा वाद कमी होताना दिसत नाही.
शिवसेना नामांतरावर ठाम-
राज्यात गेल्या अनेक दिवसांपासून औरंगाबादच्या नामांतराचे राजकारण तापू लागले आहे. सत्तेत असलेल्या महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांची संभाजीनगर या नामकरणावर विविध भूमिका आहे. महाविकास आघाडी सरकार किमान समान कार्यक्रमावर चालत असून त्यात धर्मनिरपेक्षतेच्या मुद्द्यावर भर देण्यात आला आहे. त्यामुळे काँग्रेस-राष्ट्रवादीने या नामांतरास विरोध केला आहे. मात्र, शिवसेनेने हा आमचा अजेंडाच असल्याचे स्पष्ट केले आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील औरंगाबादचे संभाजीनगर असे नामांतर करणे हे शिवसेनेचे उद्दिष्ट असल्याचे स्पष्ट केले आहे.