औरंगाबाद - एमआयएम नगरसेवकाने कचरा संकलन करणाऱ्या कर्मचाऱ्याला मारहाण केल्याचे समोर आले आहे. त्यानंतर मनपा कर्मचाऱ्यांमध्ये संतापाची भावना उमटली आहे. एमआयएम नगरसेवक अबुल हसन हाश्मी यांनी ही मारहाण केली आहे. या घटनेनंतर मनपा कर्मचाऱ्यांकडून कामबंद आंदोलन सुरू करण्यात आले आहे
हेही वाचा - पैठण उपविभागीय पोलीस अधीक्षकांवर पाळत ठेवणारे वाळू तस्कर पोलिसांच्या ताब्यात
महानगरपालिकेसाठी पी. गोपीनाथ रेड्डी कंपनीचे कर्मचारी कचरा संकलन करतात. छोट्या गाडीत जमा झालेला कचरा मोठ्या गाडीत भरण्याचे काम आमखास मैदानाजवळ केले जाते. याचवेळी अचानक एमआयएमचे नगरसेवक तिथे आले आणि कचरा येथे टाकू नका, असे सांगूत त्यांनी कर्मचाऱयांसोबत वाद घालून मारहाण केली.
या घटनेची माहिती मिळताच रेड्डी कंपनीचे झोनल अधिकारी इरफान आणि युनूस घटनास्थळी पोहोचले. नगरसेवक हाश्मी यांनी त्यांनादेखील शिवीगाळ केली. तसेच रिक्षाला लाथा मारल्या. या घटनेनंतर कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलन सुरू केले. बुधवारी दुपारनंतर कचऱ्याची एकही गाडी कामावर आली नाही. त्याचा परिणाम गुरुवारी देखील दिसून आला. सकाळपासून कचरा संकलन करणाऱ्या सर्व गाड्या जागेवरच उभ्या आहेत. व्यावसायिक भागात कचरा संकलनाचे काम करण्यात येते, ते काम बंद होते. मारहाण करणार्या नगरसेवकावर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी कर्मचाऱ्यांची केली. या घटनेमुळे कर्मचाऱ्यांचा सुरक्षेचा प्रश्न उपस्थित होत आहे. या आधी एमआयएम खासदार इम्तियाज जलील यांनी देखील रेड्डी कंपनीच्या कचऱ्याच्या गाडीची काच फोडली होती. त्यामुळे एमआयएमला रेड्डी कंपनी करत असलेले काम बंद करायचं आहे का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.