औरंगाबाद : महाराष्ट्र दिनाच्या 61 व्या वर्धापन दिनानिमित्त विभागीय आयुक्त कार्यालयाच्या प्रांगणात आयोजित मुख्य शासकीय ध्वजारोहण कार्यक्रमात विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांच्या हस्ते आज ध्वजारोहण करण्यात आले. कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता निवडक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत ध्वजारोहण करण्यात आले.
ध्वजारोहण सोहळ्याला येण्यास मनाई
कोरोनाचा विळखा वाढत असल्याने राज्यात अनेक निर्बंध घालण्यात आले आहेत. गेल्या एक वर्षांपासून संसर्ग सतत वाढत आहे. त्यामुळे मागील वर्षी प्रमाणे यावर्षी देखील ध्वजारोहण करण्यास येऊ नये असे निर्देश देण्यात आले होते. त्यामुळे कमी लोकांच्या उपस्थितीत सोहळा पार पडला. यावेळी जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, पोलीस आयुक्त डॉ.निखील गुप्ता, महानगरपालिकेचे आयुक्त आस्तिककुमार पाण्डेय, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.मंगेश गोंदावले, पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. कोरोना विषाणुचा संसर्ग टाळण्यासाठी शासनाचे या संदर्भातील नियम पाळुन अत्यंत साधेपणाने हा कार्यक्रम घेण्यात आला.