औरंगाबाद - जिल्ह्यातील कोरोना प्रतिबंधक लसीकरणाचे (Corona Vaccination) उद्दिष्ट गाठण्यासाठी औरंगाबाद जिल्हा प्रशासन (Aurangabad District Administration) अधिक आग्रही आणि आक्रमक झाले आहे. कोविड-19 विरोधी लसीकरण मोहीम अधिक तीव्र करण्यासाठी ज्या ऑटोरिक्षा चालकांनी कोरोना लसीचा एकही डोस घेतला नाही. त्यांचे ऑटोरिक्षा जप्त करण्याचे आदेश अधिकाऱ्यांनी दिले आहेत.
जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी सोमवारी रात्री उशिरा जारी केलेल्या आदेशानुसार टूर आणि ट्रॅव्हल्स चालकांना लसीकरण न केलेल्या प्रवाशांना तिकीट विक्री करता येणार नाही. हे आदेश 25 नोव्हेंबरपासून लागू होणार आहेत. औरंगाबाद जिल्ह्याला राज्यशासनाने 30 नोव्हेंबरपर्यंत लसीकरणाचे उद्दिष्ट गाठण्याची मुदत दिलेली आहे. या मुदतीत लसीकरणाचा टक्का वाढवण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी अधिक वेगाने मोहीम हाती घेतली आहे.
जिल्ह्यात लसीकरणास मिळत असलेल्या कमी प्रतिसादाची दखल खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतली. यामुळे जिल्हा प्रशासनाने लसीकरण वाढीसाठी उपाययोजना सुरू केली. अधिकृत आकडेवारीनुसार, औरंगाबाद जिल्ह्यातील 32,24,677 लक्ष्यित लोकसंख्येपैकी 22 नोव्हेंबरपर्यंत 64.36% लोकांना पहिला डोस आणि 27.78% लोकांना दुसरा डोस घेतला आहे. महाराष्ट्रातील 36 जिल्ह्यांमध्ये लसीकरणाच्या बाबतीत औरंगाबाद 26 व्या क्रमांकावर असल्याचे अधिकाऱ्यांनी या महिन्याच्या सुरुवातीला सांगितले होते.