औरंगाबाद - संचारबंदीचा कार्यकाळ लांबल्याने अनेक व्यवसाय अडचणीत आले आहेत. यामध्ये छोट्या उद्योगधंद्याचे प्रमाण जास्त असून सर्वाधिक फटका असंघटीत क्षेत्रातील व्यवसायांना बसलाय. रस्त्यावर चपला-बूट शिवून देणाऱ्या चांभार व्यवसायिकांच्या उपजीविकेचा प्रश्न उभा राहिलाय.
तुळशीराम इटोरे शहरातील क्रांतिचौक भागात पायताणं शिवून देतात. संचारबंदीने ग्राहक बाहेर पडत नसल्याने त्यांच्या धंद्याला फटका बसलाय. तसेच प्रशासनाने देखील त्यांना दुकान बंद करण्याचे सांगितल्याने हातावर पोट असलेल्या तुळशीराम यांच्या घरातील चूल पेटेल की नाही, असा प्रश्न निर्माण झालाय.
मागील दोन महिन्यांपासून ते घरातच बसून असल्याने दूध आणायला देखील पैसे न उरल्याचे त्यांनी सांगितले. काहीतरी काम करून पैसे मिळवण्यासाठी ते आज लॉकडाऊनमधेही आपल्या कामाच्या जागेवर येऊन बसत आहेत. रोज तुटलेले चपला-बूट शिवायचे आणि मिळेल त्या पैशात घर चालवायचं, हाच त्यांचा दिनक्रम. मात्र आजकाल त्यातही घाराचा गाडा चालवणं अवघडच, त्यामुळे दिवसा रस्त्यावर बसून काम केल्यानंतर रात्री ते सुरक्षा रक्षकाचे काम करतात. संचारबंदीनंतर कामावर असताना मिळालेला पगार घरभाडे देण्यात गेला. तर जमवलेल्या काही पैशात त्यांनी दोन महिने काढले. आता दुधासाठी देखील खिशात पैसे नसल्याचे ते म्हणाले.
तुळशीराम शहरातील समता नगर भागात राहतात. या परिसरात काही दिवसांपूर्वी कोरोनाचे रुग्ण आढळले होते. त्यामुळे बाहेर पडणे आणखी धोकादायक झाले. मात्र काम केल्याशिवाय जगणे सोपे नाही, हे कळल्यावर मात्र ते पुन्हा रस्त्याच्या बाजूला असणाऱ्या कामाच्या जागेवर जाऊन बसतात. रात्री सुरक्षा रक्षकाचे काम करताना पाच हजार मिळायचे. त्यावेळी घरभाडं तरी देता येत होतं. मात्र आता काय करावं, असा प्रश्न तुळशीराम यांना पडलायं. काही सामाजिक संस्थांनी त्यांना थोडं धान्य दिलं.
खरतर संचारबंदीत हातावर पोट असणाऱ्यांचे मोठ्या प्रमाणात हाल झाले. औरंगाबादमध्ये देखील एकट्या तुळशीराम यांची ही व्यथा नाहीय. तर देशात अनेक असे तुळशीराम पोटाच्या भूकेसाठी संघर्ष करतायेत.