औरंगाबाद - देशात गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल, डिझेलच्या दरात दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिक त्रस्त झाले आहेत. उन्हाळा सुरु झाला आणि त्यातच आता रमजान महिन्याला देखील सुरुवात झाली आहे. यामुळे लिंबाचा मागणीला वाढ झाली आहे. एक महिन्यापूर्वी 40 रुपये किलो असलेले लिंबू दर आता 240 रुपये किलोपर्यंत गेले आहे. लिंबाच्या वाढलेल्या किंमतीने पेट्रोलच्या दराला देखील मागे टाकले ( Lemon Price Hike In Aurangabad ) आहे.
४० रुपये किलो लिंबू आता २४० रुपयांना - फेब्रुवारी महिन्यात बाजारामध्ये लिंबाला मागणी कमी असल्यामुळे 40 रुपये किलो प्रमाणे भाव होता. मात्र, उन्हाळा सुरू झाल्याने रसवंती चालू झाल्या आहेत. त्याचसोबत रमजान महिन्यात मुस्लिम समाजामध्ये देखील लिंबाला मागणी वाढली आहे. त्यामुळे कधीकाळी 40 रुपये किलो असलेल्या लिंबाचे दर आता पाचपट वाढून 250 रुपये झाले आहे.
लिंबू सरबत महागले - अन्य ठिकाणच्या तुलनेत स्थानिक गावातून बाजारपेठेत येणारे लिंबू पाणीदार असतात. पण, स्थानिक लिंबाची आवक घटल्याने मागणीत वाढ झाली आहे. वाढलेल्या लिंबाच्या किमतींचा परिणाम लिंबू सरबातावर झाला आहे. यामुळे कधीकाळी दहा रुपये ग्लास मिळणार लिंबू सरबाताची किंमत आता पंधरा रुपये झाल्याची माहिती विक्रेत्यांनी दिली आहे.
लिंबू सर्वसामान्यांच्या अवाक्याबाहेर - कडक उन्हाळा सुरु झाल्याने नागरिक मोठ्या प्रमाणात लिंबाचा वापर करतात. लिंबातून 'व्हिटॅमिन सी' मिळते. यासोबतच पचनसंस्था सुरळीत राखण्यात मदत होते. परंतु, हे सर्व उपयोग असले तरी लिंबू घेणे सर्वसामान्य नागरिकांना परवडेनास झाले आहे.
हेही वाचा - MNS Vasant More : 'अरे मी तर कधीपासून तुझाच मावळा'; वसंत मोरेंनी केले बाबर यांचे अभिनंदन