औरंगाबाद - दहावीत असताना गावातील तरुणाशी प्रेम जुळले. तरुणीने प्रियकराशी पळून जाऊन विवाह केला. तीन चार दिवसांपासून पती घरी न आल्याने १८ वर्षीय तरुणीने वर्षभरातच राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या (girl commits suicide) केली. ही घटना वाळूज एमआयडीसी (Waluj MIDC) परिसरात शुक्रवारी (७ जानेवारी) रोजी उघडकीस आली.
या प्रकरणी अधिक माहिती अशी की, मृत तरुणी आणि गणेश दोघेही उमरखेड तालुक्यातील आहेत. तरुणी ही दहावीत असताना तिची गावातील गणेशसोबत ओळख झाली. ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले. दोघांनी विवाह करण्याचे ठरवले. मात्र, विवाहाला गणेशच्या घरातील लोकांचा विरोध होता. यामुळे दोघांनी पळून जाण्याचा निर्णय घेतला. काही दिवसांनी नातेवाईकांनी दोघांना गावाकडे बोलावून त्यांचा विवाह लावून दिला. मात्र, गणेशच्या घरातील लोकांचा विरोध असल्याने ते दोघ औरंगाबादमध्ये आले. वाळूज एमआयडीसी परिसरात खोली भाड्याने घेतली. गणेश कंपनीत कामाला जाऊ लागला. मात्र, गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यात वाद होत असल्याचे तरुणीने घरी फोन करून सांगितले होते. यातच तीन चार दिवसांपासून गणेश घरी न आल्याने तरुणीने वडिलांना फोन करून सांगितले. यावेळी वडिलांनी तिला घरी येण्याचा सल्ला देत भावाने तिला येण्यासाठी हजार रुपये पाठवले.
वडिलांनी फोन केल्याने आले उघडकीस -
दोन दिवस झाली मुलीला पैसे पाठवून तरी देखील ती घरी न आल्याने वडिलांनी तरुणीच्या शेजारील लोकांना फोन करून त्यांच्याशी बोलणे करून देण्याची मागणी केली. यावेळी शेजारी लोकांनी त्यांच्या घरी जाऊन बघितले असता दार बंद होते. खिडकीतून बघितले असता तरुणीने गळफास घेतला होता. दरम्यान, पोलिसांच्या मदतीने तिला तत्काळ घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले. यावेळी डॉक्टरांनी तपासून तिला मृत घोषित केले. या प्रकरणी वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यामध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक संदीप शिंदे करीत आहेत. तरुणीवर अंत्यविधी झाल्यानंतर तिच्या पती विरुद्ध गुन्हा दाखल करणार असल्याचे तरुणीच्या भावाने सांगितले आहे.