औरंगाबाद - शहराचे ग्रामदैवत असलेल्या संस्थान गणपतीच्या पूजनाने शहरातील गणेशोत्सवाला सुरुवात झाली. पहिल्यांदाच साधेपणाने आरती आणि पूजन करून उत्सवाला सुरुवात करण्यात आली. कोरोनाच्या अनुषंगाने यावर्षी गणेशोत्सवाच्या काळात कुठलेही धार्मिक कार्यक्रम न करता फक्त विधिवत पूजाअर्चा केली जाणार असल्याची माहिती संस्थान गणपती विश्वस्तांनी दिली.
शिवसेना नेते चंद्रकांत खैरे, आमदार हरिभाऊ बागडे, संजय शिरसाठ, अतुल सावे, प्रदीप जैस्वाल, पृथ्वीराज पवार, माजी महापौर नंदकुमार घोडेले यांच्या उपस्थित सोशल डिस्टन्सचे पालन करून आरती आणि स्थापना करण्यात आली.
यावर्षीच्या गणेश उत्सवावर कोरोनाचे सावट पाहायला मिळालं. बाजारात असलेली रेलचेल कमी दिसून आली. ग्रामदैवत असलेल्या संस्थान गणपतीच्या पूजनाने उत्सवाला सुरुवात झाली. पूजन करत असताना कोविड संदर्भात दिलेल्या सूचनांचे पालन केले गेले. यावर्षी पुढील दहा दिवस कुठलेही उपक्रम राबवले जाणार नसल्याची माहिती संस्थान गणपती विश्वस्त मंडळाकडून देण्यात आली. गणेशोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी रक्तदान शिबिर ठेवण्यात आले. आहे तर पुढील आठ दिवस आरोग्य तपासणी शिबीर ठेवण्यात आले आहे.
दरवर्षी मोठ्या उत्साहात विविध सामाजिक उपक्रम राबवत गणेशउत्सव साजरा केला जातो. मात्र कोरोनाच संकट पाहता यावर्षी खबरदारी घेत काही निर्बंध लावण्यात आले. दरवर्षी दहा दिवस मोठ्या प्रमाणात अन्नदान केलं जातं. मात्र यावर्षी अन्नदान न करता अनाथ आश्रमात मुलांना भोजन देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. इतकंच नाही तर शहरातील विविध भागात कोरोनाबाबत जनजागृती करण्यासाठी संस्थान गणेश विश्वस्त मंडळाने पुढाकार घेतला आहे. शहरातील विविध भागांमध्ये पोस्टर आणि फलक लावून कोरोनाच्या अनुषंगाने जनजागृती केली जाणार असल्याची माहिती विश्वस्तांनी दिली.