औरंगाबाद - आपल्या मैत्रीच्या नात्याला नवी उभारी देण्यासाठी ऑगस्ट महिन्यातील पहिला रविवार हा जागतिक फ्रेंडशिप डे म्हणून सर्वत्र साजरा केला जाते. अबालवृद्ध फ्रेंडशिप डेच्या दिनी आपल्या मैत्रीत असलेले हेवेदावे विसरून पून्हा मैत्रीने वागत असतात. मात्र यंदाच्याही फ्रेंडशिप डेवर कोरोनाचे सावट दिसून येत आहे. कोरोनाच्या निर्बंधामुळे यावर्षीही आपल्या प्रिय मित्राला भेटता येत नाही आहे. त्याला हातात बांधण्यासाठी फ्रेंडशिप बँड, भेटपत्र, भेटवस्तू देता येत नाही आहे. त्यामुळे याचा परिणाम हा बाजारपेठेवर देखील होतांना पाहवयास मिळाला आहे. फ्रेंडशिपच्या निमित्ताने भरगच्च असलेली बाजार पेठ विकेंड लॉकडाउन असल्यामुळे सुनीसुनी दिसुन आली. यामुळे फ्रेंडशिप डेचे साहित्य विक्री करणाऱ्या व्यावसायिकांना देखील साहित्य विक्रीची चिंता लागली आहे.
हॅन्ड बँडला असते सर्वाधिक मागणी -
ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या रविवारी फ्रेंडशिप डे साजरा केला जातो. या दिवसाला आपल्या जवळच्या मित्रांच्या हातात बँड बांधून मैत्रीची असलेली भावना व्यक्त केली जाते. त्यात वेगवेगळ्या प्रकारचे हॅंडबँड बाजारात विक्रीसाठी येतात. पाच रुपयांपासून ते पन्नास रुपयांपर्यंत हँडबँड हात गाडी ते मोठ्या दुकानात उपलब्ध असतात. त्यांना फ्रेंडशिप डे साजरा करणाऱ्या लहान मुलांपासून ते वयस्कर व्यक्तींची मोठी मागणी असते. त्याच बरोबर भेटपत्र आणि भेटवस्तूंची मागणी देखील असते. मात्र गेल्या दीड वर्षात कोरोनामुळे मित्रांच्या भेट घेण्यावर निर्बंध आले आहेत. भेटीगाठी देखील कमी झाल्या. त्यामुळे मागील वर्षी आणि यावर्षी असे सलग दोन वर्षे हँडबँड विक्री करणाऱ्या व्यावसायिकांना आर्थिक भुर्दंड सोसावा लागला आहे.
विकेंड लॉकडाऊनचा व्यवसायांवर परिणाम -
कोरोनाची दुसरी लाट नियंत्रित करण्यासाठी विकेंड लॉकडाउनचा पर्याय राज्यात लागू करण्यात आला. शनिवार आणि रविवारी बहुतांश लोकांना सुट्टी असल्याने बाजारात खरेदीसाठी मोठी गर्दी होते. हीच गर्दी टाळण्यासाठी विकेंड लॉकडाऊन लावण्यात आला असला तरी यामुळे व्यावसायिकांचे नुकसान होत आहे. त्यात फ्रेंडशिप डे देखील रविवारी आल्याने त्यावर आधारित व्यवसाय शनिवारी आणि रविवारी सर्वाधिक होतो. मात्र असलेला विकेंड लॉकडाऊन पाहता त्याचा परिणाम व्यावसायिकांना सोसावा लागत आहे. जिल्ह्यात होणारी उलाढाल पाहता लाखोंचे नुकसान होत असल्याचे मत औरंगपुरा येथील व्यावसायिक सुहास देशपांडे यांनी व्यक्त केले आहे.