औरंगाबाद - कोरोनाचा संसर्ग वेगाने पसरण्यास सुरुवात झाली आहे. सोमवारी 29 रुग्ण वाढले असताना मंगळवारी सकाळी 13 रुग्ण नव्याने आढळून आले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील रुग्ण संख्या थेट 95 वर पोहोचली आहे.
शहरातील किलेअर्क हा भाग नवीन हॉटस्पॉट निर्माण झाला आहे. गेल्या दहा दिवसात या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात रुग्ण आढळून येत आहेत. किलेअर्क येथे 25 रुग्ण आढळून आले आहेत. त्यात एका रुग्णाचा मृत्यू झाल्याने परिसर सील करून घरोघरी जाऊन लोकांची तपासणी केली जात आहे.
गेल्या दोन दिवसात औरंगाबादेत कोरोनाची दहशत वाढली आहे. तीनच दिवसात कोरोनाचे पन्नासहून नवीन रुग्ण आढळून आले आहेत. त्यात नूर कॉलनीत - 12, किलेअर्क - 25, काळा दरवाजा - 1, आसेफिया कॉलनी - 2, भीमनगर - 2, टाऊनहॉल या भागांचा समावेश आहे. आतापर्यंत 23 रुग्ण उपचारानंतर घरी गेले आहेत तर 6 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. उर्वरित रुग्णांवर जिल्हा रुग्णालय आणि घाटी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
सोमवारी आढळले होते ३ रुग्ण, तर २३ जणांना मिळाली होती सुट्टी
शहरात कोरोनाचा संसर्ग झपाट्याने पसरत आहे. तीन रुग्णांचे सोमवारी सायंकाळी अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत. रविवारी एकाच दिवशी चार रुग्ण आढळून आले होते.
सोमवारी सायंकाळी आढळून आलेल्या कोरोना रुग्णांमध्ये दोन मुलांसह महिलेचा समावेश आहे. यात भीमनगर भावसिंगपुरा येथे 16 वर्षीय मुलाला, किलेअर्क येथे 65 वर्षीय महिलेला तर नूरकॉलनी येथे 5 वर्षीय मुलाला कोरोनाची लागण झाली आहे.
दोन दिवसांमध्ये कोरोनाच्या रुग्णांमध्ये 7ने वाढ झाली आहे. तर सकाळी किलेअर्क येथील महिलेचा मृत्यू झाला आहे. या महिलेच्या घरातील सदस्यांसह जवळपास 45 जणांची तपासणी करण्यात आली आहे. त्यांना पालिकेने विलगीकरणात ठेवले आहे. तर 17 वर्षीय तरुणाला उपचारानंतर घरी सोडण्यात आले आहे.