औरंगाबाद - भाषा शिकण्यासाठी कुठलीही बंधने नसतात. त्यात मराठी सारखी गोड भाषा शिकायला नेहमीच पसंती मिळते. औरंगाबादमध्ये शिक्षणासाठी आलेल्या दोन विदेशी तरुणींना मराठी भाषेने मोहिनी घातल्याचे पाहायला मिळाले. शिक्षणासाठी आलेल्या या दोघींनी काही महिन्यात मराठी शिकली.
लिटेसिया आणि मेलीन असे या दोन परदेशी तरुणींचे नाव आहे. लिटेसिया ही ब्राझीलची आहे तर मेलीन फ्रान्समधून आली आहे. दोघीही औरंगाबादच्या देवगिरी महाविद्यालयात 12 वी विज्ञान शाखेचे शिक्षण घेत असून वरकड कुटुंबीयांसोबत गेल्या आठ महिन्यांपासून त्या वास्तव्य करत आहेत. रोटरी क्लबच्याअंतर्गत चालत असलेल्या एका प्रकल्पामुळे त्या औरंगाबादच्या वरकड कुटुंबीयांसोबत राहत आहेत.
लिटेसियाला मराठी भाषेचे विशेष आकर्षण आहे. तिला उत्तम मराठी बोलता येते. अवघ्या आठ महिन्यात तिने मराठी अवगत करून घेतली. वरकड कुटुंबीयांसोबत राहत असताना फक्त ऐकून त्यांनी भाषा शिकली. भारतातील खाद्यपदार्थ खूप आवडतात. पोहे, कुस्करा, मसाला डोसा, पाणीपुरी तिचे आवडते खाद्य पदार्थ आहेत. वैशिष्ठ म्हणजे तिला पोहे, खिचडी देखील चांगली तयार करता येते. भारतीय सणांमध्ये नवरात्री तिला आवडते. तिला गरभा खेळायला आवडतो तर देवांमध्ये गणपती आवडता देव आहे. मराठी अजून चांगली शिकण्याची इच्छा लिटेसियाने व्यक्त केली.
तर मेलीनला मराठी बोललेले कळते. मात्र, तिला स्पष्ट बोलता येत नाही. मेलीनला मराठी शिकायची असून मराठी खूप सुंदर भाषा असल्याचे तिने सांगितले. वरकड कुटुंबीयात राहून त्या कुटुंबातील एक झाल्या आहेत. या दोघींकडून बरंच शिकायला मिळत असल्याची भावना वरकड कुटुंबीयांनी व्यक्त केली. लिटेसिया आणि मेलीन यांच्यासह वरकड कुटुंबीयांशी चर्चा केली आमचे प्रतिनिधी अमित फुटाणे यांनी.