औरंगाबाद - सुरतमध्ये कोचिंग क्लासला लागलेल्या आगीत २० पेक्षा अधिक विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर औरंगाबादेत खबदारीचे उपाय म्हणून खासगी कोचिंग क्लास चालकांना अग्निशामक विभागाने नोटीस जारी केली आहे.
शहरातील कोचिंग क्लासमध्ये अनुचित प्रकार घडू नये, यासाठी या नोटीस जारी केल्या आहेत. शहरातही जवळपास साडे तीनशे कोचिंग क्लास चालकांना नोटीस बजावण्यात आली आहे. यात ८ दिवसांत कोचिंग क्लासमध्ये आग लागली तर विद्यार्थ्यांच्या बचावासाठी काय उपाय योजना आहेत, याबाबत लेखी उत्तर कोचिंग क्लास चालकांना देणे बंधनकारक आहे.
या नोटिसेला उत्तर दिले गेले नाही तर संबंधित कोचिंग क्लास चालकांविरोधात पोलिसात तक्रार देणार असल्याची माहितीही अग्निशामक दलाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.
काय आहे सुरतची घटना -
सुरतमध्ये खासगी कोचिंग क्लासला अचानक आग लागली. आगी पासून बचाव करण्यासाठी विद्यार्थ्यांनी धावाधाव सुरू केली. मात्र, एकाच वेळी सर्व विद्यार्थ्यांना बाहेर पडण्यासाठी योग्य जागा नसल्याने अनेक विद्यार्थी कोचिंग क्लासच्या छतावर चढले आणि त्यांनी खाली उड्या घेतल्या. या घटनेत २० हून अधिक विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला.