औरंगाबाद - जवाहरनगर परिसरात नागरिकांनी 51 हजार लाडूंची बांधणी केली आहे. हे लाडू आषाढी एकादशीच्या दिवशी पंढरपूर येथे आलेल्या वारकऱ्यांसाठी मोफत दिले जाणार आहेत. या परिसरातल्या उपक्रमाचे हे 14 वर्षे आहे
जवाहरनगर येथे रहिवासी असलेले मनोज सुर्वे यांनी तेरा वर्षांपूर्वी या उपक्रमाला सुरुवात केली होती. पहिल्या वर्षी अकराशे लाडूंची बांधणी करण्यात आली होती. हे लाडू वारकऱ्यांना मोफत दिले जातात. हळूहळू दरवर्षी ह्या लाडूंची संख्या वाढवण्यात आली. तेरा वर्षानंतर आता लाडूंची संख्या 51 हजारांवर जाऊन पोहोचली आहे. हे सर्व लाडू तयार करण्यासाठी परिसरातील नागरिक आनंदाने मदतीसाठी पुढे येतात.
रविवारची सकाळ जवाहरनगर परिसरातील नागरिकांसाठी भक्तिमय सकाळ होती. कारण सकाळची सुरुवात पांडुरंगाच्या नामस्मरणाने झाली. आषाढी एकादशीनिमित्त रविवारच्या दिवशी नागरिकांनी तब्बल गूळ शेंगदाण्याचे 51 हजार लाडू बांधले. लाडक्या पांडुरंगाच्या सेवेसाठी हा एक दिवस परिसरातील नागरिक देतात. एक लाडू पांडुरंगासाठी असा उपक्रम हे नागरिक दरवर्षी राबवतात. या उपक्रमाचे हे 14 वर्ष चौदाव वर्ष नागरिकांनी सकाळीच भजन-कीर्तन गात लाडूची बांधणी सुरुवात केली. 51 हजार लाडू तयार करण्यासाठी तब्बल 900 किलो शेंगदाणे, 900 किलो गूळ आणि 50 किलो तूप वापरण्यात आले.
दरवर्षी परिसरातील नागरिक एकत्र येऊन लोकसहभागातून या लाडूंची निर्मिती करतात. पांडुरंगाची भक्ती करण्यासाठी अनेक वारकरी पंढरपूरच्या दिशेने चालू लागतात. पंधरा ते वीस दिवस प्रवास करून आषाढी एकादशीच्या दिवशी आपल्या लाडक्या पांडुरंगाचे दर्शन वारकरी घेत असतो. मात्र, त्या पांडुरंगाच दर्शन घेण्यासाठी पंढरपूरला जाणे हे प्रत्येकाला शक्य होत नाही. त्यामुळे पांडुरंगाच्या रुपात असलेल्या वारकऱ्यांची सेवा करण्यासाठी दरवर्षी ह्या लाडूंची निर्मिती केली जाते. तयार केलेले लाडू पंढरपूरला नेले जातात आणि आषाढी एकादशीच्या दिवशी वारकऱ्यांसाठी हे मोफत वाटले जातात. हा उपक्रम राबवताना वेगळाच आनंद या नागरिकांना मिळतो. त्यामुळेच दरवर्षी लाडू तयार करणाऱ्या नागरिकांची संख्या वाढत चालली आहे. केवळ महिला नाही तर पुरुष मंडळी लाडू तयार करण्याचे काम आनंदाने करतात. भजन, कीर्तन, अभंग गात या लाडूंची निर्मिती केली जाते. या उपक्रमात जवळपास पाचशे महिला आणि दोनशे ते तीनशे पुरुष सहभागी होतात. एक लाडू पांडुरंगासाठी तयार करताना पांडुरंगाची सेवा केल्याचा आनंद मिळत असल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली.