औरंगाबाद - अफगाणिस्तानमध्ये असलेल्या परिस्थितीनंतर आता जिल्ह्यात हाय अलर्ट जारी करण्यात आले आहेत. अफगाणिस्तान येथून येणाऱ्या नागरिकांमुळे पोलिओ सक्रिय होण्याची भीती असल्याने हा अलर्ट देण्यात आला असून येणाऱ्या नागरिकांची माहिती देण्याचा सूचना पालिकेने दिल्या आहेत.
अफगाणिस्तानमध्ये पोलिओ अद्याप सक्रिय
भारतात पोलिओ आजारावर नियंत्रण मिळवण्यात यश आल असले तरी शेजारी असणारा पाकिस्तान आणि अफगाणिस्तान या देशांमध्ये अद्याप पोलिओचे रुग्ण आढळून येतात. अफगाणिस्तानमधील परिस्थिती लक्षात घेता स्थलांतरित नागरिकांमुळे पोलिओ भारतात येण्याची भीती व्यक्त केली जात असल्याने काळजी घेतली जात आहे. त्याचाच भाग म्हणून औरंगाबाद महानगर पालिकेने नागरिकांना अलर्ट जाहीर केला आहे.
अफगाणिस्तानातील नागरिकांचे स्थलांतरावर असेल लक्ष
अफगाणिस्तानातील सत्तांतरानंतर अफगाण नागरिकांचे स्थलांतर मोठ्या प्रमाणावर सुरु आहे. हे नागरिक भारतात देखील येत आहेत. त्यात औरंगाबादेत नागरिक आल्यास त्या बाबत महानगर पालिका आणि पोलीस विभागाला माहिती देण्याचे आवाहन करण्यात आले आहे. अफगाणिस्तान येथून आलेल्या नागरिकांची आरोग्य तपासणी करून पोलिओबाबत असलेली शंका दूर करता येईल, याकरिता नागरिकांना सूचना देण्यात आल्याची माहिती महानगर पालिका आरोग्य अधिकारी डॉ. नीता पाडळकर यांनी दिली आहे.
हेही वाचा - मुंबईत कोरोनाच्या रुग्णसंख्येत पुन्हा वाढ; मात्र दुपटीचा कालावधी झाला कमी