औरंगाबाद - तू कमावत नाहीस. तू घरात येऊ नकोस असे म्हणत दलालवाडी येथील एक वृद्ध पिता आपल्या मुलाला रागाने बोलता होता. वडील आपल्यावर रागवल्याचा राग दारू पिऊन आलेल्या मुलाला अनावर झाल्यामुळे त्याने आपल्या पित्याला बेदम मारहाण केली. यावेळी पित्याचे डोके हे भिंतीला लागल्याने ते गंभीर जखमी झाले. उपचारासाठी त्यांना घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. दरम्यान त्यांचा मृत्यू झाला आहे.
डोक्यात दगड मारून वडिलांना केले जखमी -
शहरातील दलालवाडी येथील भिकनराव रत्नाकर शेळके वय ५५ कामगार आहेत. त्यांना तीन मुली आणि एक मुलगा आहे. त्यांचा मुलगा विकास शेळके ३२ हा मोबाइल रिपेरिंगचे काम करीत होता. मात्र, तो दारूच्या आहारी गेल्याने एक वर्षापूर्वी त्याची पत्नी त्याला सोडून गेली. मुलगा सांभाळत नसल्याने भिकनराव शेळके हे त्यांच्या विष्णुनगरात राहणाऱ्या मुलीकडे वास्तव्यास होते. दलालवाडीत विकास हा आईसोबत राहत होता. शुक्रवार दि.२ रोजी रात्री भिकनराव शेळके हे दलालवाडी येथील घरी आले होते. रात्री साडेदहाच्या सुमारास विकास हा दारूच्या नशेत घरी आला. तेव्हा त्यास वडिलांनी 'तू कमावत नाहीस. तू घरात येऊ नकोस असे म्हणत मुलगा विकास यास घराबाहेर जाण्यास सांगितले. घरातून हाकलल्याचा राग अनावर झाल्याने विकासने घरात घुसून वडिलांना बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. डोक्यात दगड मारून त्यांचे डोके भिंतीवर आपटले.
सामाजिक कार्यकर्ते आले धावून -
आरडाओरड ऐकून सामाजिक कार्यकर्तांनी भिकनराव यांची मुलाच्या तावडीतून त्यांची सुटका केली. या मारहाणीत भिकनराव हे गंभीर जखमी झाले होते. अजय चावरिया यांनी भिकनराव यांना तत्काळ उपचारांसाठी घाटीत दाखल केले. त्यांच्यावर उपचार सुरू असताना मध्यरात्री अडीच वाजता त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणात क्रांती चौक पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हेही वाचा - नागपूर: भरवस्तीत मारहाण करणाऱ्या गुंडाची दोन आरोपींकडून हत्या