औरंगाबाद - राज्यात लॉकडाऊन आहे. मात्र नागरिकांना त्याचे गांभीर्य नसल्याचे चित्र अनेक ठिकाणी दिसून येत आहे. त्याच प्रमाणे शहरातही अनेक नागरिक काही न काही कारण काढून बाहेर निघण्याचा प्रयत्न करत आहेत. एवढेच नाही तर कुत्र्याला सोडण्याचे कारण देत एका दाम्पत्याने बाहेर प्रवास करण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार समोर आला आहे. मात्र पोलिसांनी वेळीच त्यांना अडवत पुन्हा घरी पाठवले आहे.
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊन सुरू आहे. शहरासह जिल्ह्यात सर्वत्र नाकाबंदी करण्यात आली असून येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येक वाहनांची तपासणी केली जात आहे. इतकंच नाही तर बाहेरून येणाऱ्या आणि बाहेर जाणाऱ्या प्रत्येकाला बाहेर पडण्याबाबत पोलीस चौकशी करत आहेत.
औरंगाबादच्या हर्सूल टी पॉईंटजवळ पोलीस नाकाबंदी करत होते. त्यावेळी एका दुचाकीवर एका भल्या मोठ्या कुत्र्याला घेऊन निघालेले एक दाम्पत्य दिसून आले. पेट्रोल टाकीवर कुत्र तर महिलेजवळ मोठी बॅग पाहून पोलिसांनी त्यांना हटकले आणि या दाम्पत्याची विचारपूस केली. त्यावेळी त्यांनी कुत्र्याला गावी सोडायला जात असल्याचे अजब कारण सांगितले. हे कारण ऐकून पोलीस क्षणभर आवाक झाले.
दाम्पत्य म्हणाले, की लॉकडाऊनमुळे घराबाहेर निघणे अवघड झाले आहे. मात्र, आमच्याकडे पाळीव कुत्रा आहे. आता त्यास प्रात: विधीसाठी बाहेर घेऊन जाणेही अडचणीचे झाले आहे. त्यामुळे आता कुत्र्याला सोडायला आम्ही गावी जात आहोत. यावर पोलिसांनी या दाम्पत्याला समजून सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र, या दांपत्याने जवळपास 10 मिनिटे पोलिसांशी वाद घालायला सुरुवात केली. तरीही अखेर पोलिसांनी त्यांची समजूत काढून त्यांना परत घराकडे पाठवले आहे.
कुत्र्याला सोडायला जायचे आहे, असे एक कारण नसून नागरिक अनेक कारणे पुढे करून लॉकडाऊन काळातही घराबाहेर पडत आहेत. मात्र, लोकांनी आपल्या आरोग्यासाठी तरी घरी राहावे, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.