औरंगाबाद - बायजीपुरा येथील माजी नगरसेवक शेख जफर शेख अख्तर उर्फ बिल्डर यांच्या तिसऱ्या पत्नीने विष पिऊन आत्महत्या केली आहे. ही घटना आज पहाटे पावणे पाच वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली आहे. दोन वर्षांपूर्वी या महिलेने पतीकडून छळ होत असल्याची तक्रार जिन्सी पोलीस ठाण्यात केली होती.
सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, फरजाना बेगम (३४,करिम कॉलनी, मदिना मशिद) यांनी राहत्या घरात विष पिले. ही माहिती मिळताच शेख जफर यांनी त्यांना तातडीने घाटी रुग्णालयात दाखल केले. उपचार सुरू असताना सकाळी साडेसात वाजेच्या सुमारास फरजाना यांची प्राणज्योत मालवली. फरजाना यांच्यावर गंजेशहिदा येथील दफनभूमीमध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत. फरजाना यांना जफर यांच्यापासून एक तीन वर्षांची मुलगी आहे. फरजाना बेगम यांच्या आत्महत्येने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.