औरंगाबाद - काही दिवसांपूर्वी मोंढा नाक्यावर रिक्षाचालकाकडून १६ वर्षीय तरुणीचा विनयभंग केल्याची घटना घडली असताना आता पुन्हा शहरात रिक्षाचालकाने महिलेशी आक्षेपार्ह वर्तन केल्याची घटना रविवार दुपारी घडली आहे. संबंधित महिलेने रिक्षातून आरडाओरडा केल्याने रस्त्याने जाणाऱ्या दोन शिक्षकांनी दुचाकी अडवी लावत रिक्षा थांबवली. यावेळी महिलेने रिक्षाचालकाला भर रस्त्यात चोप दिला.
रिक्षाचालक मद्यधुंद अवस्थेत -
जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षक असलेले बाळासाहेब गरुड, जयप्रकाश टाकणखार सलीम अली सरोवर परिसरातून जात असताना एका धावत्या रिक्षामधून महिलेचा आरडाओरडा त्यांना ऐकू आला. रिक्षात असलेली महिला 'अहो भाऊ, या रिक्षावाल्याला थांबवायला लावा,' असे म्हणत होती. त्यांनी तत्काळ आपली दुचाकी रिक्षासमोर नेऊन आडवी लावली. त्यामुळे यावेळी महिलेने रिक्षातून उतरता चालकाला मारहाण करायला सुरुवात केली. मोठी गर्दी झाल्याने रिक्षाचालकाने घटनास्थळावरून पळ काढला. दरम्यान याप्रकरणी महिलेने अद्याप पोलिसांत तक्रार दिली नसल्याने कुठलीही कारवाई झाली नाही. यावेळी रिक्षाचालक मद्यधुंद अवस्थेत असल्याचे महिलेने सांगितले. या प्रकारामुळे पुन्हा शहरातील महिलांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
हेही वाचा- अंबरनाथमध्ये कार आणि रिक्षाचा भीषण अपघात, चार जण ठार