औरंगाबाद - लॉकडाऊनमुळे व्यवसाय ठप्प झाल्याने चालक आर्थिक संकटात सापडले आहेत. त्यामुळे गाड्यांचे हप्ते कसे भरायचे असा प्रश्न वाहन चालक - मालकांना पडला आहे. या वाहन चालक-मालकांनी जय संघर्ष वाहन चालक संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केले. सरकारने अशा परिस्थितीत मदत करण्याची मागणी आंदोलक चालकांनी केली.
कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी जवळपास गेल्या तीन महिन्यांपासून लॉकडाऊन करण्यात आला आहे. त्यामुळे रिक्षा, ट्रॅक्टर, ट्रॅव्हल्सची चारचाकी वाहने चालवणाऱ्या चालक आणि व्यावसायिकांवर संकट ओढवले आहे. 1 जूनपासून सर्व व्यवसायात शिथिलता देण्यात आली आहे. मात्र वाहन व्यवसायाला अद्याप मान्यता देण्यात आली नाही. त्यामुळे कुटुंब चालवणे अवघड झाल्याने सोशल डिस्टन्सचे पालन करुन चालक-मालकांनी जिल्हाधिकारी कार्यालयापुढे आंदोलन केले.
हाताला काम नाही, वाहन भाड्याने कोणी घेत नाही, अशा स्थितीमध्ये वाहनांचे हप्ते भरायचे कसे, याची चिंता चालक-मालकांना पडली आहे. अनेक जणांनी खासगी पतसंस्था, सहकार बँकेतून कर्ज घेतल्याने त्यांना हप्ते भरावे लागतात. बँकांनी तीन महिने हप्ते घेऊ नये, अशा सूचना सरकारने दिल्या होत्या, मात्र या सूचना वाहन कर्जासाठी नसल्याने बँकांनी पैसे भरण्यासाठी तगादा लावला आहे. त्यामुळे सरकारने या बँक आणि पतसंस्थांना हप्ते न घेण्याच्या सूचना कराव्यात, सरकारने आर्थिक मदत करावी, आदी मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जय संघर्ष वाहन-चालक संस्थेच्या वतीने आंदोलन करण्यात आले. गेल्या काही दिवसापासून मागणी करणाऱ्या या चालक आणि मालकांना प्रशासन मदत करत नाही. ऐकत नाही म्हणून आज अखेर रस्त्यावर उतरुन आंदोलन करण्याची वेळ आल्याचा आरोप जय संघर्ष वाहन चालक संस्थेचे अध्यक्ष संजय हाळनोर यांनी केला. सरकारने वाहन चालकांना दिलासा देण्यासाठी काही ठोस उपाय योजना कराव्यात, अशी मागणी आंदोलकांनी केली.
सरकारने मागण्यांचा गांभीर्याने विचार न केल्यास थकीत कर्ज असलेली वाहन जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उभी करावी लागतील, असा इशारा यावेळी जय संघर्ष वाहन संघटनेचे अध्यक्ष संजय हाळनोर यांनी दिला. संघटनेच्या वतीने संतोष काळवणे, संतोष गडवे, रमेश कोलते, सागरसिंग राजपूत, सुरेश गायकवाड, गौतम गायकवाड, लक्ष्मण सोनवणे, लक्ष्मण शेंडगे, जयसिंग बेळगे, रविंद्र बनसोडे, बाळु अवसरमल, आनंद भिसेसह अनेक वाहन चालक सहभागी झाले होते.