औरंगाबाद - एकीकडे संपूर्ण देशभरात १४ जानेवारी रोजी मकरसंक्रातीचा ( Makar Sankranti 2022 ) सण साजरा करण्यात येत असताना दुसरीकडे नामविस्तार दिनही ( Namvistar Din ) साजरा केला जात आहे. औरंगाबादेतील मराठवाडा विद्यापीठाला ( Marathwada Vidyapeeth ) डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव देण्यात आले ( Dr Babasaheb Ambedkar Marathwada University ) तो हा दिवस. १७ वर्षांचा संघर्ष, कित्येकांनी गमावलेले प्राण यातून हे नामविस्तार आंदोलन यशस्वी झाले. चला तर जाणून घेऊयात या नामविस्तार ( Namantar Andolan ) आंदोलनाविषयी..
१७ वर्षे चालला नामांतर लढा
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारातून साकारण्यात आलेल्या या विद्यापीठाला बाबासाहेबांचं नाव देण्यासाठी तब्बल सोळा ते सतरा वर्षे लढा द्यावा लागला. अनेकांना आपले प्राण गमवावे लागले, तर अनेकांना तुरुंगातही जावे लागले. समाजातील प्रत्येक घटकाने एकत्र येत उभारलेला लढा म्हणजे, मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतराचा लढा ( Marathwada Vidyapeeth Namantar Andolan ). १९७८ मध्ये या नामांतर लढ्याला सुरुवात झाली. त्यावेळच्या मंत्रिमंडळाने एकमुखाने मागणी मान्य केली असली, तरी त्यावेळच्या उच्चशिक्षित घटकाने याला जातीवादी स्वरूप देण्याचा प्रयत्न करत, बाबासाहेबांच्या नावाला विरोध केला. मराठवाड्यात गोरगरीब शेतकर्यांच्या मुलांना शिक्षण मिळावे म्हणून, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी औरंगाबादेत मिलिंद महाविद्यालयाची स्थापना केली होती. त्यावेळी विद्यापीठ असावे असा आग्रह त्यांनी केला होता. त्यामुळे विद्यापीठाला बाबासाहेबांचं नाव असावं, असा आग्रह होता. त्यामुळे बाबासाहेबांच्या अनुयायांना मोठा लढा उभारावा लागल्याचे माहिती अभ्यासक डॉ. सतीश ढगे यांनी सांगितलं.
मराठवाड्यातील युवक शिक्षणापासून होते वंचित
भारत देश १९४७ ला स्वतंत्र झाला असला तरी, मराठवाड्याला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी तब्बल १३ महिन्यांचा अधिकचा लढा द्यावा लागला. निजामांच्या तावडीत मराठवाडा असल्याने लढा उभारावा ( Marathwada Mukti Sangram ) लागला. त्यावेळी मराठवाड्यातील युवकांना उच्चशिक्षणासाठी हैदराबादच्या उस्मानिया विद्यापीठात जावं लागायचं आणि ते प्रत्येकाला परवडणार नव्हतं. त्यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मराठवाड्यात शिक्षणाची दारे खुली करत, मिलिंद महाविद्यालय सुरू केलं. त्यानंतर विद्यापीठ मराठवाड्यात असावं असा आग्रह त्यांनी धरला आणि त्यांच्या संकल्पनेतून मराठवाडा विद्यापीठाची स्थापना झाली. त्यामुळे गोरगरिबांना स्वस्तात शिक्षण घेणे शक्य झालं.
डॉ. बाबासाहेबांच्या नावाचा होता आग्रह
१९५८ च्या सुमारास मराठवाडा विद्यापीठाला नाव देण्यासाठी प्रयत्न सुरू करण्यात आले होते. त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यापैकी एक नाव देण्याच्या चर्चा सुरू होत्या. मात्र, छत्रपती शिवाजी महाराज आणि शाहू महाराज यांच्या नावावर आधीच विद्यापीठ असल्याने डॉ. बाबासाहेबांच नाव विद्यापीठाला द्यावे, असा आग्रह धरण्यात आला. ज्या मराठवाड्यात बाबासाहेबांमुळे गोरगरिबांना शिक्षण मिळत आहे त्यांचं नाव द्यायला हवं अशी मागणी १९७८ पासून जोर धरू लागली होती. त्यानंतर ते नाव विद्यापीठाला देण्यासाठी तब्बल १७ वर्षांचा लढा लढावा लागला. अखेर त्यावेळचे मुख्यमंत्री शरद पवार यांनी १४ जानेवारी १९९४ रोजी विद्यापीठाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्याची घोषणा केली.