औरंगाबाद - स्मार्ट सिटी ( Smart City Aurangabad ) अंतर्गत शहरात विविध काम केले जात आहेत. या कामांमध्ये तयार करण्यात आलेले सायकल ट्रॅक वादाच्या भोवऱ्यात अडकले ( Cycle track in controversy ) आहेत. शहरात सायकल चालवणाऱ्या नागरिकांची संख्या नगण्य आहे. त्यात कोणाची मागणी नसताना चार ट्रॅक तयार करण्यात आले आहेत. ज्यावर सायकल कमी आणि अतिक्रमण जास्त होत असल्याचं पाहायल मिळत ( Encroachment on cycle track ) आहेत.
सायकलस्वार नसताना चार ट्रॅक - औद्योगिक विकास झपाट्याने करणार शहर म्हणून ओळख असलेल्या ऐतिहासिक शहरात आधुनिक वाहनांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यात सायकल चालवणाऱ्या नागरिकांना मोकळीक आणि सुरक्षा मिळावी याकरिता महानगर पालिकेने स्मार्ट सिटी अंतर्गत सायकल ट्रॅक तयार केले. शहरात आता पर्यंत कोट्यवधी रुपये खर्च करून पाच ठिकाणी ट्रॅक तयार करण्यात आले आहेत. ज्यामधे क्रांतीचौक - रेल्वेस्टेशन रस्ता, न्यायालय परिसर, टिव्ही सेंटर रस्ता, एम जी एम रस्ता यासह आणि आणखी एक रस्त्यावर हे ट्रॅक उभारण्यात आले आहेत. उद्देश चांगला असला तरी या ट्रॅक वर सायकल चालवणाऱ्या नागरिकांची संख्या बोटावर मोजण्या इतकीच आहे. त्यात सायकल ट्रॅक मुळे रस्त्याची रुंदी कमी झाली, वाहन उभी करायला जागा नसल्याने वाहन काही ठिकाणी रस्त्यावर उभी करावी लागतात, परिणामी वाहतुकीला अडचण होत आहे. त्यामुळे इतका खर्च कशाला आणि त्यातून काय साध्य झाले असा प्रश्न उपस्थितीत केला जातोय.
सीसीटिव्ही प्रकल्प ठरतोय उपयोगी - स्मार्ट सिटी अंतर्गत शहराच्या विविध भागांत लक्ष ठेवण्यासाठी ७०० सीसीटिव्ही लावण्यात आले ( 700 CCTVs installed ) आहेत. त्यासाठी नियंत्रण कक्ष तयार करण्यात आले असून त्या माध्यमातून शहरातील वेगवेगळ्या भागांच्या हालचालींवर लक्ष ठेवणे सोयीचे झाले आहे. पोलिसांना गुन्ह्यांमध्ये तपास कामी या कॅमेऱ्याचा उपयोग होत आहे.
स्मार्ट बस मुळे दिलासा मात्र - शहरात नागरिकांना प्रवास करताना रिक्षाचा अधिक वापर करावा लागतो. कारण सरकारी सार्वजनिक वाहतूक यंत्रणा सज्ज नसल्याने नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. स्मार्ट सिटी अंतर्गत १०० स्मार्ट बस सुरू करण्यात आल्या. शहर आणि आसपासच्या परिसरात जाण्यासाठी नागरिकांना सुविधा झाली. या उपक्रमात १०० माजी सैनिकांना काम देण्यात आले. चालक आणि वाहक पदावर त्यांना कार्यरत करण्यात आले. तर आता ई बस ची चाचणी सुरू करण्यात आली असून लवकरच ३५ ई बस रस्त्यावर धावणार असून त्यामुळे पर्यावरण संरक्षण केले जाईल असा विश्वास स्मार्ट सिटीच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला.