औरंगाबाद - लॉकडाऊनच्या काळात सर्वच व्यवहार ठप्प झाले. त्यामुळे अनेक लहान मोठे उद्योग अडचणीत सापडले आहेत. यात सर्वाधिक अडचणीत सापडला आहे तो शेतकरी. भाजीपाला बाजारात आणण्यासाठी येणाऱ्या अडचणी पाहता शेतकऱ्यांना अनेकदा भाजीपाला फेकून द्यावा लागत आहे. त्यामुळेच जिल्हा कृषी विभागाने शेतकऱ्यांचे अनेक गट तयार करून शेतमाल थेट ग्राहकांपर्यंत पोहोचवण्यास सुरुवात केली. यामधून सध्या जवळपास सव्वा कोटींची उलाढाल झाली असल्याची माहिती कृषी विभागाचे अधीक्षक डॉ. तू. स. मोठे यांनी दिली आहे.
हेही वाचा... दिल्लीतील भाजीमार्केटमधील ११ व्यापाऱ्यांना कोरोनाची लागण
शेतमाल ग्राहकांपर्यंत पोहोचवल्याने जिल्ह्यातील काही शेतकऱ्यांना या लॉकडाउनच्या काळात देखील चांगलाच फायदा झाला आहे. लॉकडाऊनच्या काळात शहरात शेतमाल विकायचा कसा? असा प्रश्न निर्माण झाला होता. त्यातच मालाला भाव मिळेल का, याची भीती होती. त्यामुळेच अनेक भाजीपाला, फळ उत्पादक शेतकरी चिंतेत पडले होते. मात्र, यावर कृषी खात्याने युक्ती काढली आणि त्यातूनच शेतकऱ्यांनी गेल्या महिनाभरात औरंगाबादेत तब्बल 1 कोटी 23 लाखांचा माल विकला गेल्याची माहिती समोर येत आहे.
शेतकऱ्यांना यासाठी कोणालाही कमिशन द्यावे लागले नाही. कृषी खात्याने 65 शेतकरी गटांना एकत्र केले. त्यांना शहरात यायचा परवाना दिला. कुठे ग्राहक मिळू शकतात, याचे मार्गदर्शन केले. आपला शेतमाल विकताना घ्यायची काळजी, याबाबत देखील शेतकऱ्यांचे प्रबोधन केले. भाजी विकायला येताना सोशल डिस्टन्सिंग पाळायचे, सोबत मास्क आणि हॅन्ड ग्लोव्हस्सुद्धा अनिवार्य केले आहेत.
शेतकऱ्यांनी आपले काम सुरू केले. हळूहळू आपला शेतमाल विक्री करण्यास सोशल मीडियाचा आधार घेतला. आता अनेकांनी आपला शेतीमाल विकण्यासाठी व्हॉट्सअॅप नंबर ग्राहकांना दिले आहेत. त्यानुसार येणाऱ्या ऑर्डरप्रमाणे भाजीपाला शहरात आणून थेट ग्राहकांना दिला जात आहे.