औरंगाबाद - राज्यात कोरोनाच्या रुग्णांची संख्या दहा हजारांच्या पार गेली आहे. औरंगाबादमध्ये देखील कोरोनाची रुग्ण संख्या झपाट्याने वाढत आहे. रविवारी सकाळी आलेल्या अहवालानुसार औरंगाबादमध्ये कोरोनाचे 17 नवीन रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे शहराची रुग्णसंख्या आता 273 वर जाऊन पोहचली आहे.
मुकुंदवाडी हा परिसर आता कोरोनाचा नवा हॉटस्पॉट ठरत आहे. या भागात 16 नवीन रुग्ण आढळून आले आहेत. गेल्या पाच दिवसांमध्ये इतर जुन्या भागासह या भागात जास्त रुग्ण आढळून आले असल्याने हा परिसर पूर्णतः सील करण्यात आला आहे.
हेही वाचा... मुंबईत होणारे 'IFSC' केंद्र गुजरातमध्ये हलवले ! केंद्राच्या निर्णयानंतर राज्यात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी सुरु
औरंगाबाद जिल्ह्यात विशेषतः शहरात कोरोनाने हाहाकार माजवला आहे. गेल्या सात दिवसात शहरात 200 नवे रुग्ण आढळून आले आहेत. गेल्या आठवड्यात मंद गतीने आढळून येणारे रुग्ण आता अधिक वेगाने आढळत आहेत. त्यामुळे प्रशासनासमोर चिंता वाढत चालली आहे. शनिवारी एकाच दिवशी 40 नवीन रुग्ण आढळून आले आहेत. त्यात रविवारी सकाळी 17 नवीन रुग्ण आढळून आले. गेल्या सात दिवसांमध्ये रोज किमान 25 ते 30 रुग्ण वाढत असल्याने रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ झाली. त्यामुळे रुग्णसंख्या 273 वर पोहचली आहे.