औरंगाबाद - शहरात करण्यात आलेल्या अँटीबॉडी तपासणीचा अहवाल प्राप्त झाला असून त्याची सरासरी 12 टक्के इतकी आली आहे. त्यामुळे नागरिकांनी अजून सतर्क राहण्याचा सल्ला आरोग्य विभागाकडून देण्यात आला आला आहे.
शहरात 10 ते 18 ऑगस्ट दरम्यान शहरातील 115 वॉर्डांमध्ये अँटीबॉडी तपासणी म्हणजे सिरो सर्वेक्षण करण्यात आले. या सर्वेक्षणात शहरात किती जणांमध्ये कोविड अँटीबॉडी तयार झाल्या याची माहिती संकलित करण्यात आली. प्रत्येक वॉर्डातील प्रत्येक दहा घरानंतर एका कुटुंबातील काही सदस्यांची तपासणी करण्यात आली ज्यामध्ये वृद्ध, मध्यमवयीन आणि मुलांचा समावेश असल्याची माहिती जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी दिली.
औरंगाबाद शहरात 12 टक्के नागरिकांमध्ये तयार झाल्या कोरोना अँटीबॉडी शहरातील उच्च वस्तीसह झोपडपट्टी भागात सेरो सर्वेक्षण करण्यात आले. ज्यामध्ये झोपडपट्टी भागात 14.56 टक्के लोकांमध्ये तर इतर लोकांमध्ये 10.64 टक्के लोकांमध्ये अँटीबॉडी तयार झाल्याचे समोर आले. स्त्री आणि पुरुषांमध्ये समान प्रमाणात प्रतिद्रव्ये तयार झाल्याचे अहवालात समोर आले आहे. कोरोनाविरोधी प्रतिद्रव्य आढळून आलेल्या 81 टक्के लोकांनी रुग्णांच्या प्रत्यक्ष संपर्कात आले नसल्याचे सांगितले. 12 टक्के लोकांना त्याविषयी अधिक माहिती नव्हती. तर फक्त सात टक्के लोकांनी आपला थेट संपर्क कोरोना रुग्णसोबत आल्याचे सांगितले. याआधी स्वॅब तपासणीत पॉझीटीव्ह आलेल्या 56 पैकी 22 व्यक्तींमध्ये अँटीबॉडी आढळून आल्या तर स्वॅब तपासणीमध्ये नकारार्थी आलेल्या 16. 66 टक्के व्यक्तींमध्ये कोरोनाविरोधी प्रतिद्रव्य आढळून आले. या मोहिमेमध्ये लहान मुलांची देखील तपासणी करण्यात आली होती. लहान मुलांमध्ये 8.6 टक्के इतका कोरोना विरोधी प्रतिद्रव्य आढळून आल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली. जिल्हाधिकारी कार्यालयात पत्रकार परिषद घेऊन अहवालाबाबत माहिती दिली. या पत्रकार परिषदेत जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, घाटीच्या अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर, मनपा आरोग्य अधिकारी नीता पाडळकर, घाटीच्या जन औषधवैद्यक शास्त्र विभाग प्रमुख डॉ. जगन्नाथ दीक्षित यांनी माहिती दिली.