औरंगाबाद - वस्तू आणि सेवा करातील जाचक अटींविरोधात औरंगाबाद व्यापारी महासंघाने कडकडीत बंदचे पालन केले. जिल्हा व्यापारी महासंघ आणि मराठवाडा चेंबर ऑफ कॉमर्स अँड ट्रेड तर्फे देशव्यापी बंदला पाठिंबा देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार दोन दिवसांपूर्वी बंदचे आवाहन करण्यात आले होते. या बंदला औरंगाबादमध्ये मोठ्या प्रमाणात व्यापाऱ्यांनी प्रतिसाद देत बाजारपेठा बंद ठेवल्या.
महानगरपालिकेने लावला आणखी एक कर -
औरंगाबाद जिल्ह्यातील व्यापारी मोठ्या प्रमाणात कर देत असून, त्यामध्ये महापालिकेने व्यापार्यांकडून व्यवसाय परवाना कर बंधनकारक करण्यात आला आहे. मात्र, ज्या जागेत व्यवसाय करतो, त्याचा महापालिकेला व्यावसायिक दराने मालमत्ता कर भरावा लागतो. परत त्याच व्यवसायासाठी परवाना शुल्क आकारणी बेकायदा असल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. महानगरपालिका अनावश्यक कर लागत असून हा कर रद्द करावा अशी मागणी व्यापाऱ्यांनी केली आहे.
सकाळपासून बाजारपेठेत कडकडीत बंद -
जीएसटी कायद्याच्या मसुद्यात असलेल्या तरतुदी आणि जाचक अटीं विरोधात भारत व्यापार बंद असे आव्हान करण्यात आले होते. महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, मराठवाडा चेंबर ऑफ कॉमर्स आणि जिल्हा व्यापारी महासंघाने पाठिंबा दिला. सकाळपासूनच औरंगाबाद जिल्ह्यातील सर्वच बाजारपेठा बंद असून, काही अपवाद वगळता बंदला जवळपास 90 टक्के प्रतिसाद दिसून आला. जीएसटी भरत असताना काही चुका झाल्या तर व्यापाऱ्यांवर थेट कारवाईचे संकेत देण्यात आले आहेत. इतकंच नाही तर परवाना रद्द देखील करण्यात जातो त्यामुळे व्यापार अडचणीत आल्याने कायद्यात बदल करावा अशी मागणी औरंगाबाद जिल्हा व्यापारी महासंघ तर्फे करण्यात आली आहे.