औरंगाबाद - प्रशासनाने चारा चालकांना नवीन जाचक अटी लावल्या आहेत. या अटी पूर्ण करणे शक्य नाहीत. त्यामुळे १६ मे पासून सर्व चारा छावणी चालकांनी चारा छावण्या बंद करण्याचा इशारा प्रशासनाला दिला आहे.
प्रशासनाने चारा छावणी चालकांची बैठक घेऊन नवीन अटी लावणार असल्याच्या सूचना दिल्या आहेत. नवीन नियमानुसार रोज चारा छावणीतील जनावरांना टॅग लावणे बंधनकारक असणार आहे. मात्र, ही प्रक्रिया वेळखाऊ आणि अडचणीची आहे. यासाठी सरकारने यंत्रणा कामाला लावावी अशी विनंती चारा छावणी मालकांनी सरकारला केली आहे. प्रशासनाने जनावरांना १५ किलो ऐवजी १८ किलो चारा देण्याच्या नवीन सूचना जारी केल्या आहेत. मात्र, चाऱ्याचे दर वाढवण्यात आले नाहीत. त्यामुळे चारा छावणी चालवायची कशी, असा प्रश्न चारा छावणी चालकांनी उपस्थित केला आहे.
राज्यात भीषण दुष्काळ असून शेतकऱ्यांची जनावरे जगवण्यासाठी अनेक ठिकाणी सामाजिक संस्थांच्या मदतीने चारा छावण्या सुरू करण्यात आल्या आहेत. औरंगाबाद जिल्ह्यात चारा छावणी सुरू करण्याचे अनेक प्रस्ताव प्रलंबित असून प्रत्यक्षात १२ चारा छावण्या सुरू करण्यात आल्या आहेत. मात्र, या छावण्यादेखील बंद करण्याचा इशारा चालकांनी दिला आहे.