औरंगाबाद - मराठवाड्यातील आठपैकी सात जागांवर महायुतीने यश मिळवून हा भाग आपला बालेकिल्ला असल्याचे दाखवून दिले आहे. मात्र असे असले तरी औरंगाबादमध्ये शिवसेनेचे नेते व महायुतीचे उमेदवार खासदार चंद्रकांत खैरे यांचा पराभव झाला आहे. एमआयएमचे उमेदवार इम्तियाज जलील यांनी खैरे यांचा पराभव केला आहे.
तब्बल २० वर्षानंतर शिवसेनेला औरंगाबादमध्ये पराभवाचे तोंड पाहावे लागले आहे. औरंगाबादमधून गेली २० वर्षे खैरे हे लोकसभेचे प्रतिनिधीत्व करत आहेत. तर शिवसेनेच्या गेल्या ३० वर्षापासून महापालिका ताब्यात आहे.
हे असू शकतात पराभवाची कारणे-
हर्षवर्धन जाधव यांच्या लोकसभा उमेदवारीमुळे चंद्रकांत खैरे यांना फटका बसला आहे. मोदींच्या लाटेत खैरे हे पुन्हा खासदार होतील, अशी शिवसेनेची अपेक्षा फोल ठरली आहे. हर्षवर्धन जाधवांच्या माध्यमातून अनेकांनी बदल शोधला. काही मराठा संघटनांनी जाधव यांना पाठिंबा दिला होता. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवेंनी हर्षवर्धन जाधवांना छुपी मदत केल्याचा शिवसेनेकडून यापूर्वी आरोप करण्यात आला होता. एमआयएमचा विजय झाल्याने औरंगाबादच्या राजकारणात महत्त्वाचा बदल झाला आहे.