औरंगाबाद - संचारबंदी असताना औरंगपुरा भागात भाजपा आमदार प्रशांत बंब यांची पोलिसांसोबत शाब्दिक बाचाबाची झाली. बंब यांच्या परिचित व्यक्तीला पोलिसांनी अडवत पावती दिल्याने हा वाद झाला आहे. कोरोनाबाधित रुग्णाला पाणी देण्यासाठी जात असलेल्या व्यक्तीला पोलिसांनी अडवले असल्याने संतप्त झालो असल्याचे आमदार बंब यांनी सांगितले.
संचारबंदीचे नियम मोडत असल्याने कारवाई
गरज नसताना या व्यक्तीने संचारबंदीचे नियम मोडत असल्याने कारवाई केल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. ही व्यक्ती आपल्या घरातील कोविड रुग्णांना पाणी देण्यासाठी जात असताना कारवाई का केली, असा प्रश्न बंब यांनी उपस्थित करत नाकाबंदीच्या ठिकाणी असणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांसोबत वाद घातला. अखेर क्रांतीचौक पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दराडे यांना येऊन वाद मिटवावा लागला.
पोलिसांनी अडवल्यावर अनेकांचे वाद!
शहरात कोविडच्या संचारबंदीमुळे नाकाबंदी सुरू करण्यात आली आहे. बंदचा दुसरा दिवस असून बंदच्या काळात अत्यावश्यक सेवेसाठी दिलेल्या सूटमुळे अनेक नागरिक गैरफायदा घेत रस्त्यावर वावरत असल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे पोलिसांनी अडवल्यावर अनेकांचे वाद होताना दिसून येत आहे.
हेही वाचा : देशात तब्बल २ लाख १७ हजार नव्या कोरोना रुग्णांची नोंद; १,१८५ मृत्यू