औरंगाबाद - देश स्वतंत्र होण्यासाठी शेकडो वर्षे देशवासियांना संघर्ष केला. अनेकांनी आपले बलिदान दिले. याच लढ्याची साक्ष देत आहे टिळक नगर येथील भारत माता मंदिर ( Bharat Mata Temple Aurangabad ). हातात तिरंगा ध्वज घेतलेली आठ फुटी भारत मातेची मूर्ती आणि आसपास शंभर हुतात्मा क्रांतिकारकांचे फोटो आणि माहिती पूर्ण लढा दर्शवतात. अशी माहिती देणार देशातील असे एकमेव मंदिर असल्याच बोलले जात आहे.
बलिदान देणाऱ्या स्वातंत्र्य सैनिकांची मिळते माहिती : भारताला स्वातंत्र्य मिळवून 75 वर्ष पूर्ण झाली. देशाला जग भारत वेगळी ओळख मिळाली आहे. मात्र स्वातंत्र्य मिळवण्यासाठी असंख्य देशवासियांना आपले प्राण पणाला लावले. इंग्रज राजवटीला उलथून लावण्यासाठी हुतात्म्यांनी घरावर तुळशीपत्र ठेवले. त्यानंतर आपल्याला हे स्वातंत्र्य मिळाले. अशाच शंभर स्वातंत्र्य सैनिकांची माहिती या मंदिरात मिळते. मध्यभागी भारत मातेची मूर्ती आणि आजूबाजूला हुतात्म्यांचे फोटो आणि त्याखाली त्यांच्या बाबत आणि त्यांनी केलेल्या लढ्यातील योगदान बाबत माहिती आकर्षक स्वरूपात मांडण्यात आली आहे. जेणेकरून मिळालेले स्वातंत्र्य इतके सोपे नव्हते, हे नव्या पिढीला कळते, अशी माहिती माजी उपमहापौर संजय जोशी यांनी दिली.
इंग्रजांनी शिक्षा केलेल्या क्रांतिकारकांची माहिती : देशावर आपली मालकी सांगणाऱ्या इंग्रजांसोबत लढणं सोपे नव्हते. त्यावेळची अत्याधुनिक शस्त्र त्यांच्याकडे होती तर त्यांच्या विरोधात लढा उभारणाऱ्या क्रांतिकरकांकडे देशभक्ती शिवाय शस्त्र नव्हते. तरी देखील शेकडो वर्षे लढा लढण्यात आला. क्रांती घडवताना अनेक क्रांतिकारी इंग्रजांच्या हाती लागत होते. त्यावेळी त्यांना वेगवेगळ्या प्रकारच्या शिक्षा दिल्या जात होत्या. सर्वात मोठी शिक्षा म्हणजे फाशी किंवा तोफेच्या तोंडी देणे होते. टिळक नगर येथील भारत माता मंदिरात अशाच क्रांतिकारकांची माहिती आहे. ज्यांना इंग्रजांनी शिक्षा करून मारले होते. त्यात महिला आणि युवतींचा देखील सहभाग होता. त्याबाबत सर्वांना माहिती व्हावी याकरिता मंदिरात तशी माहिती संकलित करून मांडल्याची, माहिती संजय जोशी आणि माजी नगरसेविका साधना सुरडकर यांनी दिली.
या करिता म्हणले जाते मंदिर : भारताला स्वातंत्र्य मिळाल्याची पन्नास वर्षे पूर्ण झाली त्याच औचित्य साधून स्वातंत्र्य सैनिक स्व. प्रल्हादजी अभ्यंकर आणि माजी उपमहापौर संजय जोशी यांच्या संकल्पनेतून पाच हजार स्केवर फूट जागेवर हे मंदिर उभारण्यात आले. या ठिकाणी असलेल्या स्वातंत्र्य सैनिकांचे स्मरण व्हावे, त्यांच्या असण्याने ही जागा पवित्र आहे म्हणून याला संग्रहालय न म्हणता मंदिर अस म्हणलं जात. इतकंच नाही तर या ठिकाणी आल्यावर शांत वाटावं, याच ठिकाणी आजच्या पिढीला मार्गदर्शन व्हावं यासाठी वाचनालय तयार करण्यात आलं आहे. तर दर वर्षी 9 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट या काळात विशेष सप्ताह साजरा केला जातो अशी माहिती सविता कुलकर्णी आणि साधना सुरडकर यांनी दिली.
प्रत्येक शाळांना देण्यात येते माहिती : शहरात असलेले भारत माता मंदिर अद्याप बहुतांश नागरिकांना माहिती नाही. कारण महानगर पालिकेच्या वतीने हे भव्य मंदिर उभारण्यात आले खरे मात्र त्याबाबत प्रसिद्धी देण्यात आली नाही. अस असलं तरी जिल्ह्यातील शाळांना भारत मंदिर बाबत माहिती देण्यात आली असून, अनेक वेळा शालेय विद्यार्थी माहिती घेण्यासाठी मंदिरात येत असतात, अशी माहिती स्थानिक नागरिक सागर निळकंठ यांनी दिली.
हेही वाचा - Saluting Bravehearts स्वातंत्र्य लढ्यात सहभागी होता आले याचा सार्थ अभिमान - शेषराव मुरकुटे