औरंगाबाद - गुजरातमधील सॉफ्टवेअर कंपनीत संगणक अभियंता म्हणून नोकरीला असलेल्या एका तरुणाला महिलेने सव्वा लाखांचा गंडा घातल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. क्रेडिट कार्डची मर्यादा दुरुस्त करायची असल्याची थाप मारुन तिने फसविल्याचे तक्रारीत म्हटले आहे. हा प्रकार २० जून रोजी सकाळी अकराच्या सुमारास घडला. आता या प्रकरणी तक्रार दाखल केली आहे.
गुजरातच्या अहमदाबाद येथील युनिकैहस्तू सॉफ्टवेअर प्रा. लि. या कंपनीत वरद संजय परळीकर (२३, रा सुयोग कॉलनी, पदमपुरा) हा तरुण नोकरीला आहे. नोकरी करताना त्याला एका बँकेकडून क्रेडिट कार्ड देण्यात आले. त्यावेळी त्याला कोणतेही कर नसल्याचे सांगण्यात आले. २० जून रोजी सकाळी अकरा वाजून सात मिनिटांती वरदच्या मोबाईलवर कथित भामट्या महिलेने संपर्क साधला. त्यावेळी तिने बँकेतून बोलत असल्याची थाप मारुन त्याच्याकडे कर्मचारी क्रमांकाची मागणी केली.
क्रेडिट कार्डची मर्यादा दुरुस्त करायची आहे, असे सांगत तिने वरदच्या क्रेडिट कार्डच्या क्रमांकाची मागणी केली. त्यानंतर तिने व्हाटसअपवर काही मेसेज केले. त्यामुळे वरदचा तिच्यावर विश्वास बसला. त्यावरुन त्याने क्रेडिट कार्डची व सीव्हीव्ही क्रमांकाची माहिती तिला दिली. पुढे काही वेळातच वरदच्या खात्यातून तीनवेळा प्रत्येकी ३९ हजार ३९० अशी एकुण एक लाख १८ हजार १७० रुपयांची रक्कम कपात झाली. बँकेचे मेसेज आल्यावर फसवणूक झाल्याचे वरदच्या लक्षात आले.
या प्रकरणी फसवणूक झाल्यानंतर वरद यांनी 2 महिन्यांनंतर वरदने गुरुवारी वेदांतनगर पोलीस ठाणे गाठले. पोलीस निरीक्षक रामेश्वर रोडगे यांची भेट घेत घडलेला प्रकार सांगितला. त्यावरुन वेदांतनगर पोलीस ठाण्यात महिलेविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास निरीक्षक रोडगे करत आहेत