औरंगाबाद - प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने खासदार इम्तियाज जलील यांनी नागरिकांना शुभेच्छा देण्यासाठी समाज माध्यमावर टाकलेली पोस्ट वादात सापडली आहे. त्या पोस्टमध्ये त्यांनी भारताचा चुकीचा नकाशा टाकला. या नकाशात कश्मीरचा भाग कमी केलेला दाखवण्यात आला, त्यामुळे त्यांच्यावर टीकेची झोड उठली आहे. यावर मात्र आपण अशी कुठलीच पोस्ट समाज माध्यमांवर केलेलीच नाही. झालेले आरोप चुकीचे असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले आहे.
भाजपा आमदार अतुल सावे आक्रमक
एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष खासदार इम्तियाज जलील यांनी प्रजासत्ताकदिनी टाकलेल्या शुभेच्छा संदेशानंतर भाजपा आमदार अतुल सावे यांनी फेसबुक या समाज माध्यमावर जलील यांच्या पोस्टचा फोटो टाकत जाब विचारला आहे. चुकीच्या नकाशाबद्दल जलील यांना भूमिका स्पष्ट करण्याचे आव्हान सावे यांनी दिले.
प्रश्नांचा भडीमार
आमदार अतुल सावे यांनी या पोस्टवर असे म्हणाले, की खासदार यांचे आपल्या देशाविषयी अज्ञान? की त्यांची देशाच्या सीमेविषयी हीच समजूत आहे? की त्यांच्याकडून झालेली चूक आहे? संविधानाने दिलेल्या पदाच्या प्रत्येकास ज्ञान आहे का? असे म्हणत खासदारांनी आपली भूमिका स्पष्ट करावी, असे सावे यांनी फेसबुकमध्ये नमूद केले.
'ही पोस्ट माझी नाहीच'
अशी कोणतीही पोस्ट केली नसल्याचे स्पष्टीकरण खासदार इम्तियाज जलील यांनी दिले. इन्स्टाग्राम या समाज माध्यमाचा वापरच करत नाही. मी अशी कोणतीही पोस्ट केलेली नाही. माझ्या नावाने कोणीतरी अकाउंट काढून असे केले असेल तर माहीत नाही. भाजपाला आता काही काम राहिलेले नाही. नवा वाद निर्माण करण्यासाठी भाजपाकडून असे प्रयत्न नेहमीच होत असतात. त्यांनीच हे अकाउंट तयार केले नसेल कशावरून? असा प्रश्न जलील यांनी उपस्थित करत मी पोस्ट केली नसल्याचे सांगितले.