औरंगाबाद - युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरे यांची जनआशिर्वाद यात्रा सध्या औरंगाबादेत आली आहे. यावेळी एका सभेदरम्यान उपस्थित महिलांना संबोधित करत असताना ठाकरे यांनी, बांगड्या भरणारे हात आता कमजोर नाहीत, ते सक्षम आहेत, असे विधान केले आहे.
हेही वाचा... जनआशिर्वाद यात्रा : आदित्य ठाकरेंचे बुलडाण्यात भावी मुख्यमंत्री म्हणून स्वागत
बांगड्या हे आता शक्तीचे प्रतिक बनले आहे - ठाकरे
औरंगाबादचे शिवसेनेचे शहर प्रमुख बाळासाहेब थोरात यांनी आदित्य ठाकरे यांच्या हस्ते महिलांना 101 शिलाई मशीनचे मोफत वाटप केले. यावेळी उपस्थित महिलांना संबोधित करताना आदित्य यांनी आज संपूर्ण देश खऱ्या अर्थाने महिला चालवत आहेत. त्यामुळे पूर्वी एखाद्याला कमजोर दाखवण्यासाठी बांगड्या देण्याची जी पद्धत होती, ती आता बदलायला पाहिजे. कारण बांगड्या हे आता शक्तीचे प्रतिक बनले आहे. असे बोलत ठाकरे यांनी महिला मेळाव्यातील उपस्थित महिलांची मने जिंकण्याचा प्रयत्न केला.
हेही वाचा... मुख्यमंत्र्यांच्या महाजनादेश यात्रेचे औरंगाबादेत जंगी स्वागत
नवे राज्य घडवण्यासाठी सर्वांची साथ मागण्यासाठी मी आलोय - आदित्य ठाकरे
लोकांचे दुःख, अपेक्षा समजून घेण्यासाठी आपण बाहेर पडलो आहे. राज्यात कर्जमुक्ती, बेरोजगारी, शेतीचे प्रश्न सोडवून नवे राज्य घडवण्यासाठी सर्वांची साथ मागण्यासाठी मी आलो असल्याचे आदित्य यांनी या महिला मेळाव्यात सांगितले. महाराष्ट्रातील जनतेने शिवसेनेला भरभरून प्रेम दिले आहे, त्याचेच आभार मानण्यासाठी ही यात्रा असल्याचेही ठाकरे यावेळी म्हणाले.
हेही वाचा... आदित्य ठाकरेंची यात्रा जनआशीर्वादासाठी की फडणवीस सरकारची पोलखोल करण्यासाठी?