औरंगाबाद - महानगरपालिकेचे आयुक्त म्हणून आस्तिक कुमार पांडेय यांनी आपला पदभार स्वीकारला. यावेळी आयुक्तांनी आपल्या शिस्तीचा पहिला नमुना पालिका अधिकाऱ्यांना दाखवला. प्लास्टिक कॅरीबॅग असलेला पुष्पगुच्छ दिल्याने रचना विभागाचे सहाय्यक संचालक रामचंद्र महाजन यांनाच आयुक्तांनी पाच हजारांचा दंड लावला. या कारवाईतून आपण शहरात प्लास्टिक बंदीची मोहीम सुरू केली असल्याचे, पांडेय यांनी म्हटले आहे.
हेही वाचा... नव्या आयुक्तांचे स्वागत करायला गेले, अन् पाच हजारांचा दंड भरून आले!
महात्मा गांधीजी सांगत असे की, चांगल्या कामाची सुरुवात आपल्या घरापासून करावी. म्हणून प्लास्टिक बंदीची मोहीम राबवताना पालिकेच्या अधिकाऱ्याला पहिला दंड ठोठावला. शहरातील अनेक समस्या सोडवण्यासाठी आपण काम करू. मात्र, त्यामध्ये लोकसहभाग आवश्यक असल्याचे मत औरंगाबाद महानगरपालिकेचे नवनियुक्त आयुक्त आस्तिक कुमार पांडेय यांनी व्यक्त केले.
हेही वाचा... भाजीपाल्याच्या दराचे वास्तव; कांदा वगळता सर्व काही कवडीमोल
राज्यात प्लास्टिक बंदी लागू झाली, तरी औरंगाबाद जिल्ह्यात अनेक ठिकाणी कॅरीबॅगचा सर्रास वापर होत आहे. पालिका प्रशासन मात्र त्याकडे दुर्लक्ष करत असल्याचे दिसून येत होते. आता मात्र आयुक्तांनी पालिकेच्या अधिकाऱ्यालाच दंड करून मोहीमेची सुरुवात केल्याने नागरिकांनाही हा एकप्रकारचा इशारा आहे. तसेच व्यापारी आणि नागरिकांनी प्लास्टिकचा वापर करू नये. अन्यथा कारवाई होईल, असे आयुक्तांनी यावेळी म्हटले आहे.
हेही वाचा... उच्च न्यायालयाकडून गँगस्टर अरुण गवळीला दणका; जन्मठेप कायम
शहरात रस्ते, पाणी आणि स्वच्छता हे प्रमुख प्रश्न आहेत. ते सर्व प्रश्न सोडवण्यासाठी आपण काम करणार असल्याचे पांडेय यांनी सांगितले. तसेच शहरात डेंग्यूची साथ वाढली होती. त्याबाबत आपण तातडीने मोहीम राबवणार आहोत. त्यासाठी दहा पथके निर्माण करण्यात येणार आहे. सकाळपासून हे पथक काम करेल. त्यात आपण देखील अनेक ठिकाणी पाहणी करणार असल्याचे आयुक्त आस्तिक कुमार पांडेय यांनी यावेळी सांगितले.