औरंगाबाद - कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता, राज्य सरकारने सर्व शाळा, महाविद्यालय 15 फेब्रुवारीपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र या निर्णयाविरोधात आता महाराष्ट्र इंग्लिश स्कूल ट्रस्टीज् असोसिएशन 'मेस्टा' संघटनेने विरोध दर्शवत 17 जानेवारीपासून शाळा सुरू करणार असल्याची भूमिका घेतली आहे. याबाबत संघटनेचे अध्यक्ष संजय तायडे पाटील यांनी आज ( बुधवारी ) माहिती दिली.
8 जानेवारी रोजी महाराष्ट्र सरकारने राज्यातील संपूर्ण शाळा सरसकट 15 फेब्रुवारीपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. त्या अनुषंगाने महाराष्ट्र इंग्लिश स्कूल ट्रस्टीज् असोसिएशन 'मेस्टा' संघटनेने तत्काळ संस्थाचालकांची दिनांक 11 व 12 जानेवारी रोजी महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्हा पातळीवर बैठका बोलवल्या होत्या. या बैठकीमध्ये गेल्या दोन वर्षापासून कोरोनाच्या सबबीखाली मुलांचे मोठ्या प्रमाणात शैक्षणिक व भावनिक नुकसान झाले. तसेच पालकांची शाळा बंद न करण्याची आग्रहाची मागणी आदी विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. चर्चेअंती सर्वानुमते शाळा निरंतर सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला.
जिल्ह्यातील सर्व इंग्रजी माध्यमाच्या शाळा कोविड- 19 संदर्भातील सावधगिरीचे सर्व नियम पाळून सुरु ठेवण्यात याव्या व विद्यार्थ्यांचे आधीच प्रचंड झालेले नुकसान पुन्हा होऊ न देण्याचा संकल्प या बैठकीत घेण्यात आला. शाळा बंद न करण्यासंदर्भाचे निवेदन जिल्हाधिकारी व मुख्यकार्यकारी अधिकारी जि. प. यांच्या मार्फत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना देणार असल्याचे 'मेस्टा' अध्यक्ष संजय तायडे पाटील यांनी सांगितले. इंग्रजी शाळा चालकांच्या झालेल्या बैठकीत 17 जानेवारी सोमवारपासून महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्ह्यातील संस्थाचालकांनी इंग्रजी शाळा सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे, असे देखील संजय तायडे पाटील यांनी सांगितले.
हेही वाचा - Tourist Places closed : आजपासून कळसुबाई, भंडारदरा पर्यटनस्थळांसह महत्वाच्या ठिकाणी पर्यटकांना बंदी