औरंगाबाद - शहरातील अथर्व कुलकर्णीला बालश्री पुरस्कार जाहीर झाला आहे. शास्त्रीय गायनासाठी त्याला हा पुरस्कार जाहीर करण्यात आला. लवकरच राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते अथर्वला हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.
मागील वर्षी दिल्लीत देशपातळीवरून आलेल्या लहान कलाकारांनी आपली कला सादर केली. या स्पर्धेत शास्त्रीय गायनासाठी अथर्वला १०-१२ या वयोगटात सर्वोत्कृष्ट गायन सादरीकरणासाठी हा पुरस्कार जाहीर करण्यात आला.
अथर्व सध्या दहावीत आहे. अथर्वला गायनाचा वारसा आपल्या आई-वडिलांकडून मिळाला. वडील अभय आणि आई अर्पिता हे उत्तम गायक, संगीतकार म्हणून प्रसिद्ध आहेत. विशेषतः त्यांच्या बालगीतांवरील दिलेल्या चाली या प्रसिद्ध आहेत. अभयार्पिता अशी ओळख असलेल्या आई वडिलांचा मुलगा असल्याने अथर्वला लहानपणीच संगीताचे बाळकडू घरातून मिळाले.
अथर्वने अभ्यासासोबत गायनाची आवड जपली. स्वरोपासना संगीत विद्यालयात त्याने संगीताचे धडे घेतले. गरवारे बालभवन मार्फत अथर्व स्पर्धक म्हणून सहभागी झाला होता. दिल्ली येथे देशातून आलेल्या अनेक बाल गायकांना मागे टाकून अथर्वने बालश्री पुरस्कार मिळवला. बालश्री मिळल्याने अथर्व आणि कुटुंबीयांचा आनंद गगनात मावत नव्हता. सर्वच क्षेत्रातून अथर्ववर कौतुकाची थाप पडत आहे.