औरंगाबाद - महावितरणच्या निष्काळजीपणामुळे विजेचा शॉक लागून एका शेतकऱ्याचा घाटी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. यामुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी मृतदेह ताब्यात न घेण्याचा पवित्रा घेतला होता. यावेळी आमदार हरिभाऊ बागडे यांनी मध्यस्थी करून मृताच्या मुलाला नोकरी सामावून घेण्याचे व आर्थिक मदत करण्याचे आदेश महावितरणला दिले. यावेळी अधिकाऱ्यांनी ग्रामस्थांना लेखी आश्वासन दिल्याने मृतदेह ताब्यात घेतला.
काय होती घटना?
आडगाव सरक येथील शेतकरी रुस्तुम पठाडे हे २७ डिसेंबर रोजी गट क्रमांक ८९मध्ये शेतात शेळ्या चारत होते. शेतात विजेची तार गेली. त्या तारेच्या खांबामध्ये विद्युत प्रवाह उतरलेला होता. पठाडे यांचा हात त्या खांबाला लागताच ते खांबाला चिकटले. हे लक्षात येताच इतर शेतकऱ्यांनी त्यांना खांबापासून अलग केले. त्यांना गंभीर अवस्थेत औरंगाबादेतील घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र काल रात्री त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
ग्रामस्थांचा आक्रमक पवित्रा
घडलेली घटना ही अत्यंत दुर्दैवी असून महावितरणच्या निष्काळजीपणामुळे गावातली एका परिवारातील व्यक्ती गेला. त्याअगोदर जनावरांचादेखील जीव गेला आहे. त्यामुळे संबंधित वायरमनला तत्काळ निलंबित करावे. मृताच्या मुलाला नोकरीत सामावून घ्यावे, तसेच त्यांना आर्थिक मदत करावी, अशी मागणी करत स्थानिकांनी घाटीत ठिय्या मांडला होता.
हरिभाऊ बागडे यांनी केली मध्यस्थी
आमदार हरिभाऊ बागडे हे ग्रामस्थांची भेट घेण्यासाठी घाटी रुग्णालयात आले. यावेळी त्यांनी महावितरण अधिकाऱ्यांची कानउघडणी केली. त्या संबंधित लाइनमनला निलंबित करून मृताच्या मुलाला नोकरीत सामावून घेण्याचे आदेश दिले. यावेळी अभियंत्यांनी सर्व अटी मान्य करून ग्रामस्थांना लेखी आश्वासन दिले. त्यानंतर ग्रामस्थांनी मृतदेह ताब्यात घेतला.