औरंगाबाद - शहराची महानगरपालिका निवडणुक अवघ्या काही दिवसांवर आली असल्यामुळे सर्वच राजकीय पक्षांनी निवडणूक लढवण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. दरम्यान आम आदमी पक्षातर्फे महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी रिंगणात उतरणार असून संपूर्ण 115 जागांवर उमेदवार उभे करणार असल्याचे महाराष्ट्र अध्यक्ष गंगादादा राचुरे यांनी शनिवारी सायंकाळी पत्रकार परिषदेत जाहीर केले. यापत्रकार परिषदेला पक्षाचे डॉ.सुभाष माने, मराठवाडा अध्यक्ष सुग्रीव मुंडे, संघटनमंत्री जनाब इसाक अंडेवला, शहर कार्याध्यक्ष वैजनाथ राठोड, शहर उपाध्यक्ष अशिर जयहिंद, शहर सचिव सतीश संचेती, कोषाध्यक्ष मंगेश गायकवाड, शहर संघटनमंत्री दत्तू पवार यांची उपस्थिती होती.
पक्षाचे पन्नास पदाधिकारी घेणार शहराचा आढावा -
शहरातील पक्षाचे पन्नास पदाधिकारी शहरातील प्रत्येक वार्डात जाऊन माहिती घेणार आहेत. उद्यापासून या कामाला सुरुवात करणार असून दिवसाला दहा वर्डा पूर्ण करणार आहेत. संपूर्ण पाहणीत नंतर तयार होणारा माहिती एकत्रित करून पंधरा दिवसात अहवाल तयार करणार आहेत. त्यावरून निवडणुकीची रूपरेषा ठरवणार आहे. येत्या काही दिवसांत महानगरपालिका निवडणुकीसाठी पक्षातर्फे जाहीरनामा तयार करून जनतेसमोर मांडणार आहेत.
संभाजीनगरच्या माध्यमातून दिशाभूल करण्याचा प्रयत्न -
पाच वर्षापूर्वी केंद्रात आणि राज्यात भाजप-शिवसेनेचे सरकार होते. त्यावेळी भाजप-शिवसेनेला औरंगाबादचे नाव संभाजीनगर का करून घेता आले नाही. एवढ्या वर्षांपासून भाजप शिवसेनेने महानगर पालिकेत काम केली नसल्यामुळे जनतेची दिशाभूल करण्यासाठी निवडणुकीच्या तोंडावर हा मुद्दा त्यांनी उपस्थित केला आहे. मुळात महानगर पालिकेच्या निवडणुकीसाठी औरंगाबाद संभाजीनगर हा मुद्दा निरर्थक असून आम्ही औरंगाबाद शहराच्या जनतेसाठी पाणी, रस्ते, रोजगार, शिक्षण या मुद्द्यांवर महानगर पालिकेची निवडणूक लढवण्यासाठी रिगणात उतरणार आहे.